मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण
By धीरज परब | Published: January 18, 2023 03:13 AM2023-01-18T03:13:37+5:302023-01-18T03:13:59+5:30
महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात आठ गाईंना लंपी चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने तात्काळ रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.
महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे व पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली आहे असे पालिके कडून सांगण्यात आले.
गोशाळेचे डॉ सुशील अग्रवाल यांनी मात्र त्या ८ गायी लंपीच्या संशयित असून त्यांना वेगळे ठेवले आहे. अन्य गोवंशाची तपासणी केली गेली आहे असे सांगितले.
लंपीची लागण झाल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत. गो जातीय प्रजाती ज्या ठिकाणी पाळले जातात त्या ठिकाणापासून अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई केली आहे. जनावरे मोकाट सोडू नये. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली जिवंत किवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली असल्यास तसेच वैरण किंवा अन्य साहित्य अन्यत्र नेण्यास मनाई केली आहे.
रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोरपणे निर्देशांची अंमलबजावणी व कार्यवाही करावी. तसेच शहरातील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था व दुग्ध व्यवसायिक यांना देखील आदेश जारी करण्यात आले आहेत.
गोजातीय प्राणी बाजार भरवणे , शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे तसेच त्यात बाधित गुरांना नेण्यास मनाई करण्यात आली आहे असे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.