आठ दिवसांत ठामपा सात रेस्ट रूम सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:43+5:302021-03-09T04:43:43+5:30
ठाणे : अर्बन रेस्ट रूम सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले न गेल्याने सोमवारी भाजपच्या नगरसेविकांनी सोमवारी महापालिका ...
ठाणे : अर्बन रेस्ट रूम सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले न गेल्याने सोमवारी भाजपच्या नगरसेविकांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारलेले सात रेस्ट रूम आठवडाभरात सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी दिली.
एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांची कुचंबना होऊ नये, या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागात १८ कोटी रुपये खर्च करून १६ अर्बन रेस्ट रूम बांधली आहेत; परंतु दोन वर्षांपासून यातील केवळ दोन रेस्ट रूम सुरू असून, उर्वरित बंद आहेत. त्यामुळे ती सुरू करावीत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, दीपा गावंड आदींसह इतर महिला पदाधिकारी आणि रिक्षाचालक महिलादेखील सहभागी झाल्या होत्या.
यावेळी आयुक्तांनी स्मार्ट सिटीचे प्रमुख गणेश देशमुख यांना बोलावून हे रेस्ट रूम केव्हा सुरू होणार, याचा जाब विचारला असता, १२ पैकी पाच रेस्ट रूम सुरू असल्याचे सांगून उर्वरित सात रेस्ट रूम आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले; परंतु आठ दिवसांनंतरही रेस्ट रूम सुरू झाले नाही तर मात्र यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे पेंडसे यांनी सांगितले.