भूस्खलनामुळे आठ फुटांचा दगड धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:26 AM2021-06-20T04:26:55+5:302021-06-20T04:26:55+5:30
ठाणे : मुंब्रा येथे भूस्खलनाच्या घटना ताज्या असताना, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटांनी कळवा आतकोनेश्वरनगर टेकडीवर ही भूस्खलनाची ...
ठाणे : मुंब्रा येथे भूस्खलनाच्या घटना ताज्या असताना, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटांनी कळवा आतकोनेश्वरनगर टेकडीवर ही भूस्खलनाची घटना घडली. यावेळी त्या टेकडीवरील सात ते आठ फुटांचा मोठा दगड काही प्रमाणात सरकून तो धोकादायक स्थितीत आला आहे. त्यातच टेकडीच्या पायथ्याशी लोकवस्ती असल्याने तातडीने कार्यवाही सुरू केल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली. यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती कळताच आपत्ती आणि अग्निशमन विभागाने धाव घेतली.
..........................
ठाण्यात इमारतीच्या डकला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बाळकूम, ढोकाळी रोडवरील हॉयलँड पार्कमधील इमारत क्रमांक ९च्या टेरेसच्या इलेक्ट्रिक डकला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यावेळी इमारतीच्या आतमध्ये धूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे इमारतीतील काही रहिवासी तातडीने खाली केले. आगीची माहिती कळताच ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी १४ आणि १५ मजल्यावरील दोन वयोवृद्ध ज्येष्ठ महिला असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही विभागांनी तातडीने त्या दोन्ही आजीबाईंसह १५-२० जणांना सुखरूपरीत्या इमारतीच्या खाली आणले. वैशाली मयेकर (७२) आणि सावित्रीदेवी (६८) अशी त्या दोन आजीबाईंची नावे आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाहीत. यावेळी, एक पाण्याचा टँकर, दोन फायर वाहन आणि दोन रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.