ठाकुर्लीतील उड्डाणपुलावर बसवले काँक्रीटचे आठ गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:05 AM2019-03-13T00:05:17+5:302019-03-13T00:05:30+5:30
आतापर्यंत एकूण २६ गर्डर टाकले, पावसाळ्यापूर्वी फाटकापर्यंत काम करण्याचे लक्ष्य
डोंबिवली : ठाकुर्ली येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आला आहे. या पुलावर आतापर्यंत २६ गर्डर टाकण्यात आले आहेत. त्यापैकी आठ गर्डर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवार रात्रीपर्यंत टाकल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला जुन्या फाटकापर्यंत जुलैपर्यंत पूल बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने कामाचा वेग वाढवल्याची माहिती केडीएमसीचे प्रकल्प उपअभियंता शैलेश मलेकर यांनी दिली.
ते म्हणाले की, पुलाचे काम कल्याण दिशेला सुरू झाले आहे. ठाकुर्ली फाटकापर्यंत १४ गर्डर आणि त्यावर प्रत्येकी चार गर्डर याप्रमाणे ५६ गर्डर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत २६ गर्डर टाकले आहेत. मात्र, ठाकुर्ली पूर्वेला जलाराम मंदिराचा रस्ता हा अरुंद आहे. त्यामुळे पुलाच्या कामात सातत्याने अडथळे येत आहेत. गर्डर पुलावर ठेवण्यासाठी मोठ्या क्रेन आणल्या आहेत. मात्र, त्या वळवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पुलानजीकच काँक्रिटचे गर्डर तयार केले आहेत. ते उचलून पिलवर वेऊन जोडण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यात वेळही जात आहे. त्यातच परिसरात इमारती असून सातत्याने नागरिकांची वर्दळ सुरू असते. या कामादरम्यान कोणताही अपघात होऊ नये, याचीही खूप काळजी घ्यावी लागत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रान्सफॉर्मर स्थलांतराला परीक्षेचा अडसर
पुलाच्या कामाच्या आड येणारा जलाराम मंदिर हॉल समोरील विजेचा ट्रान्सफॉर्मर तुळशीबागेनजीक स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शटडाउन घेता येत नाही. त्यामुळे परीक्षा संंपताच शटडाउन घेतले जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेपर्यंत हे काम पूर्ण होईल, असेही मळेकर यांनी सांगितले.