वृद्धेचे आठ लाख नोकराने लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:09 AM2018-04-26T03:09:34+5:302018-04-26T03:09:34+5:30
लागलीच केली अटक : मुलाच्या उपचारासाठी ठेवले होते घर गहाण
डोंबिवली : हदयविकाराच्या आजाराने ग्रस्त मुलाच्या उपचारासाठी झालेले कर्ज फेडण्याकरिता घाटकोपर येथील घर गहाण ठेवून वृद्ध आईने जमा केलेले आठ लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या नवीन यादव या नोकराला कल्याण गुन्हे शाखेनी अवघ्या चोवीस तासांमध्ये अटक केली.
गुलाब पुजारी या वृद्धेने घर गहाण ठेवल्यावर येणारे पैसे आणण्यासाठी दुकानामध्ये काम करणाऱ्या नवीनला मुंबईला पाठवले. मात्र, बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने त्याने पैसे गहाळ झाल्याचा बनाव केला. हा बनाव गुन्हे शाखेने उघड करीत त्याला अटक केली आहे.
कल्याण शीळ रोडवर पुजारी चहाची टपरी चालवतात. त्यांचा मुलगा सुधीर याला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. त्याच्या उपचारासाठी पुजारी यांचा बराच पैसा खर्च झाल्याने त्यांनी अनेकांकडूून कर्ज घेतले. कर्जाचा डोंगर फेडण्याकरिता पुजारी यांनी आपले घाटकोपर येथील घर आठ लाख रुपयांत गहाण ठेवले. ही रक्कम आणण्यासाठी पुजारी यांनी टपरीवर काम करणाºया नवीन या नोकराला घाटकोपरला पाठवले. यादवने त्या व्यक्तीकडून रक्कम घेतली. मात्र, लोकलने येताना पैसे हरवल्याचा बनाव करीत तशी तक्रार रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवली. डोंबिवलीला परतल्यावर यादव याने पुजारी यांनाही पैसे हरवल्याचे सांगितले. पुजारी यांनी रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलीस ठाण्यात दाद मागितली. मात्र, त्यांच्याकडूून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा पुजारी यांनी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्याकडे तक्रार केली.
बहिणीच्या लग्नासाठी
वृद्धेने नोकरावर संशय व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या यादवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बहिणीच्या लग्नासाठी ही रक्कम चोरल्याच त्याने पोलिसांना सांगितले.