रवी पुजारी टोळीतील आठ जणांना अटक
By admin | Published: October 31, 2015 12:01 AM2015-10-31T00:01:31+5:302015-10-31T00:01:31+5:30
उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
ठाणे : उल्हासनगरच्या केबल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करून त्याची हत्या करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील आठ जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि पाच काडतुसे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
प्रवीण पाटील (२५), प्रशांत सपकाळ (२९), रा. दोघेही रा. कुची, जि. सांगली, मिर्चू शर्मा (४६), रा. उल्हासनगर, शफिक शेख (३७), नामदेव आढाव (४०) रा. दोघेही अंबरनाथ तसेच नितीन आघडे, कैलास प्रधान आणि सचिन लोंढे अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत. रवी याने त्याच्या टोळीतील सहकारी सुरेश पुजारी याला ठाणे, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिसरातील राजकीय व्यक्ती आणि बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करण्यासाठी सांगितले होते. त्यावरून सुरेशने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या भागातील बांधकाम व्यावसायिक सच्चानंद कारिरा याच्याकडे त्याने खंडणीची मागणी केली होती. त्यांनी ती न दिल्याने त्याच्या टोळीतील साथीदारांच्या मदतीने ११ सप्टेंबर २०१५ रोजी कारिरा यांची त्यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयात गोळ्या घालून हत्या केली. या खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि शार्पशूटर नितीन औघडेला पोलिसांनी तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर, रवी आणि सुरेश पुजारी टोळीतील गुन्हेगारांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने राज्यात आणि राज्याबाहेर तपास करून या खुनाशी तसेच खंडणीच्या गुन्ह्यांशी संबंधित टोळीला २२ ते ३० आॅक्टोबरदरम्यान अटक केली. त्यांच्यापैकी शफिक याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे तसेच नामदेव याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि चार काडतुसे जप्त केली.