जिल्ह्यात आठ हजार ६६५ कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:30+5:302021-04-27T04:41:30+5:30
ठाणे : कोरोना रुग्णसंख्येत सध्या काहीशी घट झालेली जिल्ह्यात दिसून येत आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ८६.८६ झाले आहे. ...
ठाणे : कोरोना रुग्णसंख्येत सध्या काहीशी घट झालेली जिल्ह्यात दिसून येत आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ८६.८६ झाले आहे. तरीदेखील कोरोनाच्या काही गंभीर रुग्णांपैकी तब्बल आठ हजार ६६५ रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन घेऊन उपचारास प्रतिसाद देत असल्याचे निदर्शनात आले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याण-डोंबिवलीतील दोन हजार २४७ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा देऊन औषधोपचार केला जात आहे. यानुसार जिल्हाभरात आठ हजार ९२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर व्हेंटिलेटरवर ५७३ रुग्ण उपचार घेत आहेत. यात महापालिका क्षेत्रात सहा हजार ९२८ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. यापैकी कल्याण-डोंबिवली परिसरात दोन हजार १९९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत व ४८ रुग्ण व्हेंटिलेटरची सुविधा घेऊन उपचार घेत आहेत. याखालोखाल नवी मुंबईत एक हजार ८०९ ऑक्सिजनवर तर १९४ व्हेंटिलेटरवर आहेत. यानंतर ठाणे मनपा क्षेत्रातील एक हजार ४९९ रुग्ण ऑक्सिजन व १७९ व्हेंटिलेटरवर आजमितीस उपचार घेत आहेत. यापैकी चार रुग्णांचा मंगळवारी येथील वेदांत रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मीरा-भाईंदर महापालिका परिसरात ९९० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर व्हेंटिलेटरवर ९४ बाधित उपचार घेत आहेत. या तुलनेत भिवंडी परिसरात २३५ रुग्ण ऑक्सिजनवर असून २१ व्हेंटिलेटरवर आहेत. उल्हासनगरमध्ये १९७ जण ऑक्सिजन घेऊन उपचारास प्रतिसाद देत आहेत. अंबरनाथला ५२७ व बदलापूरला ५४० जण ऑक्सिजनवर आहेत. तर या शहरांमध्ये अनुक्रमे १५ व १६ जण व्हेंटिलेटरवर आहेत.