मोफत कोकण प्रवासासाठी आठ हजार नागरिकांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:05+5:302021-09-05T04:46:05+5:30
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना व ...
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना व मनसेने कोकणात मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेसाठी शिवसेनेकडे सात हजार, तर मनसेकडे ८०० जणांनी नोंदणी केली आहे.
डोंबिवलीतून कोकणातील महाड, मंडणगड-दापोली, खेड, चिपळूणमार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता अवघ्या पंधरवड्यात सात हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला.
आधी कोरोना, त्यापाठोपाठ कोकणात अतिवृष्टी यामुळे संकटात सापडलेल्यांना घरगुती गणेशोत्सव साजरा करता यावा, या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून कोकणात मोफत बसेस सोडण्यात येत आहेत.
अजूनही ज्यांना नोंदणी करायची आहे, त्यांनी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा, मानपाडा रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले.
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यातर्फेही कोकणात बस सोडण्यात येणार आहेत. या बससेवेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन मागील आठवड्यात करण्यात आले होते. त्याला आतापर्यंत ८०० हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. जेवढे नागरिक येतील, त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न असेल, असेही शहराध्यक्ष मनोज घरत म्हणाले.
------------