दूषित वायूचे आठ बळी : कल्याण-डोंबिवलीकरांची काळी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:36 AM2018-11-05T02:36:39+5:302018-11-05T02:37:13+5:30

येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला.

Eight victims of contaminated gas | दूषित वायूचे आठ बळी : कल्याण-डोंबिवलीकरांची काळी दिवाळी

दूषित वायूचे आठ बळी : कल्याण-डोंबिवलीकरांची काळी दिवाळी

Next

- अनिकेत घमंडी 
 
येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला. या दोन्ही घटना अनुक्रमे २५ आॅक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी घडल्या. रसायनमिश्रित ड्रेनेज मॅनहोलमध्येदेखील दूषित वायू होता, तर कल्याणच्या विहिरीतदेखील तसाच वायू होता. त्यामुळे हे बळी गेले. या दुर्घटनेनंतर तरी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन, एमआयडीसी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होणार का, की सातत्याने असे बळी जातच राहणार, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत एका नाल्यानजीक रसायनमिश्रित पाण्याशी संपर्क झाल्याने एका महिलेचा आणि कुत्र्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीच सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला असता आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या असत्या, तर अशा घटनांवर नियंत्रण मिळवता आले असते. पण, ती घटना घडली. लोकप्रतिनिधींनी त्यावेळी माध्यमांमध्ये उतावीळपणे आवाज उठवून नागरिकांविषयीची कळकळ दाखवून दिली; पण अल्पावधीतच स्थिती पुन्हा जैसे थे झाली. आता लागोपाठ घडलेल्या आणखी दोन घटनांमध्ये दिवाळीच्या तोंडावर हा प्रसंग ओढवल्याने काळी दिवाळीच म्हणावी लागेल. महापालिका अधिकाºयांच्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे ९० ते १०० विहिरी आहेत. त्यापैकी बहुतांशी खासगी विहिरी आहेत. २०१४-१५ मध्ये दुष्काळादरम्यान पाण्याचे दुर्भिक्ष असताना महापालिकेने प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये जाऊन तेथील विहिरींची स्वच्छता करण्याचा चंग बांधला होता. डोंबिवलीतही अनेक विहिरींची सफाई करण्यात आली होती. त्याचवेळी बहुतांश विहिरींमध्ये गटारांचे पाणी जमा होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचवेळी सफाई कामगारांनी, ठेकेदारांनी अथवा संबंधित नगरसेवकांनी दिलेले अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे महापालिकेने मनावर घ्यायला हवे होते. त्यानुसार, शहर हद्दीतील विहिरींची स्वच्छता नित्यनेमाने करणे आवश्यक होते तसेच एमआयडीसी परिसरातील जीवघेण्या रासायनिक कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी जर त्यांच्या ड्रेनेज सुविधेतून बाहेर येत असेल, तर त्यासाठीची योग्य विल्हेवाट लावणे, यंत्रणा राबवणे, त्यासंदर्भात संबंधित कंपन्यांना सूचित करणे अत्यावश्यक होते. परंतु, तसे काहीही न झाल्यानेच हे अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच, अशा जीवघेण्या ठिकाणी सफाई कामगारांना पाठवताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना अत्याधुनिक सुविधांसमवेत सफाईसाठी पाठवणे अत्यावश्यकच होते. ती कोणतीही काळजी का घेतली गेली नाही तसेच भीमाशंकर विहीर स्वच्छतेसंदर्भात तसेच तेथे होणाºया दूषित पाण्याच्या विसर्गासंदर्भात वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत, हे गंभीर प्रश्न आहेत. या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे निष्पापांचे बळी गेले आहेत. या घटनांनंतर तरी महापालिका क्षेत्रातील विहिरींची स्वच्छता नित्य होणार आहे का? त्यामधील पाण्याचा योग्य विनियोग होणार आहे का? केवळ दुष्काळादरम्यान पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यावरच विहिरीच्या पाण्याची आठवण होणार असेल, तर मात्र आगामी काळात अशा घटना वारंवार घडल्यास आश्चर्य व्यक्त व्हायला नको. केमिकलचा पाऊस पडून डोंबिवलीतील खड्ड्यांमध्ये हिरवे पाणी साचले होते. सर्वत्र सातत्याने दुर्गंधी पसरते, पण तरीही प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याकडे काही झालेच नाही, असा आविर्भाव आणत दुर्लक्ष करत असेल, तर मात्र परिस्थिती गंभीर आहे.
प्रदूषणामुळे डोळे चुरचुरणे, उलट्या होणे, श्वासाला त्रास होणे यासारखे अपाय शरीराला होत असल्याचे येथील रहिवासी वारंवार सांगतात. विषारी वायूमुळे अनेक त्रास त्या परिसरातील रहिवाशांना सोसावे लागत आहेत. ठिकठिकाणच्या रहिवाशांच्या गच्चीमध्ये, वाहनांवर, घराच्या खिडक्यांवरील काचांवर काळी घाण साचते. ती घाण ही केमिकलचा हवेशी संपर्क आल्यावर होणाºया काळ्या पावडरची असते. मध्यरात्री, पहाटेच्या वेळेत काही कंपन्या परिसरातील उघड्या नाल्यांमध्ये तसेच चिमण्यांमधून काळा धूर सोडतात. नाल्यात सोडलेल्या पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी येते, नागरिक हैराण होतात. या सर्व बाबी सातत्याने सांगूनही संबंधित यंत्रणांमध्ये काहीही सुधारणा होत नाही.
निष्पाप जीवांच्या बळींमुळे कल्याण-डोंबिवली परिसरामधील पिण्याच्या पाण्याच्या लाइनदेखील गटारांमधून किंवा गटारांजवळून गेल्या असतील, तर त्यांची तातडीने पाहणी करून स्वच्छता करणे, त्या पाइपलाइन योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे, ही जबाबदारी महापालिकेसह संबंधित यंत्रणेची आहे. अनेकदा गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने हगवण, उलट्या होणे, यासह अन्य आजार झाल्याच्या घटना डोंबिवलीत घडल्या आहेत. या सर्व बाबींमुळे या महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या जीवाची काहीही किंमत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
याठिकाणी ना अत्याधुनिक इस्पितळे आहेत, ना आरोग्य केंद्रे. महापालिकेची इस्पितळे ही असून नसल्यासारखी आहेत. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाच दूषित वायूमुळेही जीवाला धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी सुमारे १७ किमीचा विस्तीर्ण खाडीकिनारा आहे, पण त्या ठिकाणीही प्रदूषणामुळे प्रचंड दुर्गंधी येत असते. सांडपाणी तसेच काही ठिकाणी रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडले जाते. रेल्वेतून प्रवास करताना त्याचा उग्र दर्प येत असतो, पण त्याच दर्पाचा श्वास घेत हजारो नागरिक जीवन जगत आहेत. हे सगळे किती घातक आहे, याचा विचार सरकारी यंत्रणांनी करण्याची गरज आहे.
आठवडाभरात घडलेल्या या दोन घटनांची महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा अनास्थेचे असेच बळी जात राहतील, सर्वसामान्यांच्या जीवाची कोणालाही किंमत नाही, हेच वारंवार दिसून येईल. लोकप्रतिनिधी या सगळ्यांचा निवडणुकीपुरता प्रचारासाठी मुद्दा बनवतील. स्वत:ची पोळी भाजून घेतील; पण प्रत्यक्षात मात्र समस्या जैसे थे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला कुणीही वाली नाही का, हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.

Web Title: Eight victims of contaminated gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.