8 वी तील विद्यार्थीनीने महापालिका आयुक्तांसमोर केला 'इंटरनेट प्रकल्प' सादर !

By सुरेश लोखंडे | Published: February 26, 2023 03:29 PM2023-02-26T15:29:11+5:302023-02-26T15:30:16+5:30

या इंटरनेट प्रयोगामध्ये या अंशूने 'हायड्रॉलिक लिफ्ट'ची प्रतिकृती तयार केली आहे.

Eighth class student presented 'Internet Project' in front of Municipal Commissioner! | 8 वी तील विद्यार्थीनीने महापालिका आयुक्तांसमोर केला 'इंटरनेट प्रकल्प' सादर !

8 वी तील विद्यार्थीनीने महापालिका आयुक्तांसमोर केला 'इंटरनेट प्रकल्प' सादर !

googlenewsNext

ठाणे :  इंटरनेटचा उपयोग करून मी एक प्रकल्प बनवला आहे, तो तुम्ही पाहाल का...असा प्रश्न गेल्या आठवड्यात ठाणे महापालिका शाळा क्र. १२० मधील अंशू यादव या आठवीतील विद्यार्थींनीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना विचारला होता. यास अनुसरून बरोबर एका आठवड्याने अंशूने तिच्या प्रकल्पाचे सादरीकरण आयुक्तांच्याच कार्यालयात मोठ्या हिंमतीने केले. विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली. ...आणि सोबत समाधानाने भरलेले क्षण, आयुक्तांनी दिलेली शाबासकी घेऊन अंशू घरी परतली. त्यामुळे ठाणेकरांकडून या विद्यार्थीनींचे कौतुक होत आहे.          

या इंटरनेट प्रयोगामध्ये या अंशूने 'हायड्रॉलिक लिफ्ट'ची प्रतिकृती तयार केली आहे. फ्रेंच शास्त्रज्ञ ब्लेस पास्कल यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या 'पास्कल्स लॉ' याचा वापर 'हायड्रॉलिक लिफ्ट' तंत्रात केला जातो. त्यांवर आधारित हा प्रयोग तयार करून अंशूने धाडसाने त्याचे विश्लेषण आयुक्तांसमोर केले.  गेल्या आठवड्यात, डिजिटल शिक्षण कार्यक्रम-२०२३ या उपक्रमातंर्गत 'अक्षयपात्र' या संस्थेतर्फे ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमधील आठवीतील एकूण ३८ विद्यार्थ्यांना या आयुक्तांच्या हस्ते टॅबचे वाटप केलेले आहे. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी इंटरनेट, गुगल, त्यावरील सर्च, शास्त्रज्ञ यांच्याविषयी गप्पा मारल्या. त्यांच्या विश्वातील इंटरनेटचा उपयोग जाणून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. या गप्पांदरम्यान, अंशू यादव या विद्यार्थिनीने तिने केलेला प्रकल्प, त्यासाठी केलेले गुगल सर्च याबद्दल माहिती दिली आणि प्रकल्प पाहण्याचे आमंत्रण आयुक्तांना दिले होते.       

आयुक्तांच्या दालनात अंशूने तिचा छोटेखानी प्रकल्प आणला. सोबत, तिचे वर्गशिक्षक सुरेश पाटील आणि शाळा प्रमुख कल्पना राऊत, उपायुक्त अनघा कदम हेही उपस्थित होते. अंशूने 'हायड्रॉलिक लिफ्ट'ची प्रतिकृती तयार केली होती. फ्रेंच शास्त्रज्ञ ब्लेस पास्कल यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या पास्कल्स लॉ याचा वापर 'हायड्रॉलिक लिफ्ट' तंत्रात केला जातो. हा नियम द्रव पदार्थावरील दबावाशी संबंधित आहे. एका पात्रात ठेवलेल्या स्थिर द्रवपदार्थावर दिलेला दाब हा त्या पात्रात सर्वत्र समान पसरतो, त्याचा प्रभाव पात्राच्या आतील आवरणावरही असतो. त्यात कोणताही ऱ्हास होत नाही, असा हा नियम. तो समजून घेऊन अंशूने शिक्षकांच्या मदतीने कार लिफ्टची प्रतिकृती तयार केली आहे.        

पास्कलच्या या नियमाचा वापर आणखी कोठे केला जातो, प्रवाशांसाठी 'हायड्रॉलिक लिफ्ट' वापरली जाते का...अशा आणखी काही गोष्टींचा अभ्यास करण्याची सूचना आयुक्त  बांगर यांनी अंशूला केली. तिने या प्रकल्पासाठी घेतलेला वेळ, तयारीची पद्धत, शिक्षकांचे मार्गदर्शन आदी गोष्टी आयुक्तांनी जाणून घेतल्या. तिच्या कुतुहलाबद्दल, त्यासाठी केलेल्या मेहनतीबद्दल आणि आत्मविश्वासाने सादरीकरण केल्याबद्दल त्यांनी अंशूचे कौतुक केले.          

विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल जाणून घेऊन त्या शैक्षणिक गोष्टी, वैज्ञानिक प्रयोग त्यांना आवर्जून दाखवा. त्यासाठी विज्ञान भेटीसारखे प्रयोग राबवा, अशी सूचना बांगर यांनी उपस्थित शिक्षकांना केली. विद्यार्थी एखादा प्रयोग करतात, तो प्रयोग म्हणजे पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न असतो. अशावेळी विज्ञानाचे जे तत्व मोठ्या स्वरूपात जिथे वापरले आहे ते प्रत्यक्ष पाहिल्यास, ते तत्व कायमस्वरुपी त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात पक्के बसण्यास मदत होईल. अंशू यादव हिच्या प्रकल्पानुसार, तिला हायड्रॉलिक लिफ्टचा मोठा वापर होणारी ठिकाणे दाखवावीत, असेही  बांगर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, इंटरनेटचा योग्य वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना कायम सजग करत राहा, असेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या दालनाबाहेर आल्यावर, ही भेट आपल्यासाठी लक्षात राहील. मोठ्या अधिकाऱ्याने माझा प्रकल्प पाहण्यासाठी वेळ दिला. त्यामुळे माझा उत्साह आणखी वाढला आहे. या भेटीबद्दल मी मैत्रिणींना सांगणार आहे, हे म्हणताना अंशूच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करा

पुस्तकातून विज्ञान शिकविण्यापेक्षा वैज्ञानिक प्रयोगांच्या माध्यमातून ते शिकणे सोपे आहे. त्यामुळे शाळांतील विद्यार्थ्यांना असे प्रयोग करण्यास शिक्षकांनी प्रेरित करायला हवे.
- अभिजीत बांगर
आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे
 

Web Title: Eighth class student presented 'Internet Project' in front of Municipal Commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.