'एक शरद अन् सगळेच गारद, पवारसाहेबांवर प्रेयसीच्या पलिकडचं प्रेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 10:45 PM2020-01-26T22:45:05+5:302020-01-26T22:45:45+5:30
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत
मुंबई - बाळासाहेब आणि शरद पवार हे महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे. शरद पवारांवर आव्हाड यांचं खूप प्रेम आहे. प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम पवार यांच्यावर आहे. आमचंही शरद पवारांवर खूप प्रेम आहे. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त आहे, हे पवारसाहेबांना माहितीय, असे म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंब्रा-कळवा येथील कार्यक्रमात पवारांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच, महाविकास आघाडीची पहिली ठिणगी केव्हा पडली, हेही राऊत यांनी सांगितलं.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरील प्रेमाचा दाखला दिला. मी कार्यक्रमाला येताना होर्डिंग्ज पाहिले, त्यावर भीष्म पितामह असे लिहिले होते. मला वाटतं यात काहीच गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण, बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती, दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब हेच दोन विठ्ठल.
महाविकास आघाडीची पहिली ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा शरद पवार यांना ईडीची नोटीस गेली. कारण, आज शरद पवार यांना नोटीस पाठवली, उद्या सामान्य कार्यकर्त्यांवर ही वेळ येईल. बाळासाहेबांच्या एका व्यंगचित्राची आठवण करुन देताना, एक शरद अन् दोन गारद असं ते व्यंगचित्र होतं. पण, सद्यपरिस्थितीत ते व्यंगचित्र म्हणजे एक शरद अन् सगळे गारद असंच होईल, असेही राऊत यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड हा कडवा शिवसैनिक आहे. पण, हा शिवसैनिक पवारांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे, असे म्हणत बाळासाहेब आणि संजय राऊत यांचं जसं नातं होतं. तसंच, नातं शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं असल्याचं राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, आजचा कार्यक्रम हा गुरुकडून शिष्याच्या सत्काराचा कार्यक्रम असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.