एकादशी...अन दुप्पट खाशी!
By Admin | Published: July 14, 2016 01:49 AM2016-07-14T01:49:01+5:302016-07-14T01:49:01+5:30
एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असली तरी ती प्रत्यक्षात यावी, याचसाठी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपाहारगृहे, मराठमोळ्या
ठाणे : एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असली तरी ती प्रत्यक्षात यावी, याचसाठी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपाहारगृहे, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने, मिठाईविक्रेते आणि घरगुती पदार्थ पुरवणाऱ्यांची जय्यत तयारी झाली आहे. साबुदाण्याची खिचडी, वडे, थालिपीठ याबरोबरच मिठाईचे फ्युजन, दूधदुभत्याचे पदार्थ, रताळी, फळे यांची लयलूट सुरू आहे.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा उपवासाची थाळी, उपवासाचे फूड पॅकेज, एकादशी पॅकेट, अशा वेगवेगळ्या कल्पना घेऊन हॉटेल-उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने सज्ज झाली आहेत. साधारणत: ७० रुपयांच्या लिमिटेड डिशपासून ‘पोटभर खा आणि तृप्त व्हा’, अशा धर्तीवर अमर्याद पॅकेजही उपलब्ध आहेत. एकादशीनिमित्त उकडलेल्या रताळ्यांपासून भाजलेल्या रताळ्यांपर्यंत कंदमुळांचे पर्याय जसे उपलब्ध आहेत, तसेच शिंगाडा, राजगिरा, भुईमुगाच्या उकडलेल्या-भाजलेल्या शेंगांचेही पदार्थ आहेत.
दोन्ही वेळेस उपवास केला जात असल्याने त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांना मागणी असते, असे विक्रेत्यांनी सांगितले. उपवासाचे थालिपीठ गरमागरमच छान लागते. त्यातही काहींना शेंगदाण्याचे कूट अधिक लागते, तर काहींना त्यात बटाट्याचा कीस लागतो. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्याप्रमाणे उपाहारगृहांत पदार्थ बनवले जातात. त्यांची तयारी दोन दिवस आधीपासूनच सुरू असते. शिवाय उपवासासाठी बटाट्याचा रस्साही काही ठिकाणी मिळतो. (प्रतिनिधी)
सहज तोंडात टाकण्यासाठी... : बटाटा-केळ्याचे-रताळ्याचे वेफर्स (वेगवेगळ्या आकारांतील, डिझाइनमधील), बटाट्याचा तिखट आणि गोड चिवडा, बटाट्याच्या पापड्या, पापड, साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाण्याच्या चकल्या, गूळ-शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा लाडू, चिक्की, तिळाचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, साबुदाणा-शिंगाडा पिठाचे लाडू, खारवलेला आणि साधा सुकामेवा.
खासियत काय? : उपवासाचे बटाटेवडे, उपवासाची इडली-चटणी, डोसे, आप्पे, फिंगर चिप्स, मिसळ, नारळाचा चव-मिरची-कोथिंबीर घालून बटाट्याच्या सारणातील तिखट कचोरी, गूळ-नारळाच्या सारणाची गोड कचोरी, आलू चाट, आलू टिक्की. दह्याचा मसाला लावलेले तंदुरी आलू, उपवासाची बिस्किटे, शिंगाडा-शेंगदाणा नानकटाई.