रविवारी दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:36 PM2020-09-03T17:36:11+5:302020-09-03T17:36:19+5:30

समता विचार प्रसारक संस्था गेली २७ वर्षे ठाण्यातील लोकवस्तीतील हुशार व होतकरू मुलांसाठी एकलव्य गौरव पुरस्कार हा उपक्रम चालवीत आहे.

Eklavya Gaurav Award Ceremony at the hands of Dilip Prabhavalkar on Sunday | रविवारी दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा

रविवारी दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा

Next

ठाणे : घरातील अत्यंत प्रतिकूल आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी झगडत, केवळ जिद्द, मेहेनत आणि चिकाटीच्या जोरावर परिश्रम घेऊन १० वीच्या परीक्षेचा महत्वाचा शैक्षणिक टप्पा यशस्वीपणे पार करणार्‍या एकलव्य मुलांचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यात सुलभ मार्गक्रमणास शुभेच्छा देण्यासाठी, समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी ६ सप्टेंबरला सायं. ६ वा. २८वा वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम घेण्यात येणार असून तेव्हा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार आणि संवेदनशील लेखक मा. दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. झूम मेळाव्यात होणार्‍या या कौतुक सोहळ्याला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे आणि ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी मा. राजेश कंकाळ हे ही उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर असणार आहेत. हा कार्यक्रम समता विचार प्रसारक संस्थेच्या फेसबूक पेजवर लाईव्ह पाहता येईल. या कार्यक्रमाच्या झूम लिंकसाठी ७७३८२१४३५१ किंवा ७७३८१८९०४३ या नंबरांवर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या सह सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे.   


समता विचार प्रसारक संस्था गेली २७ वर्षे ठाण्यातील लोकवस्तीतील हुशार व होतकरू मुलांसाठी एकलव्य गौरव पुरस्कार हा उपक्रम चालवीत आहे. अतिशय हलाखीची परिस्थिति, खूप छोटे पत्र्याचे घर, अभ्यासाला जागा नाही, शाळेव्यतिरिक्त घरखर्चाला हातभार म्हणून काम करावे लागते, शिक्षण साहित्य अपुरे, शिक्षणाचे वातावरण नाही, पैशाअभावी क्लास लावणे जमत नाही अशा सर्व प्रतिकूल परिस्थितिवर मात करत जेव्हा ही मुले कष्टाने शालांत परीक्षा पास होतात तेव्हा त्यांचे कमी गुण सुद्धा उच्च वर्गातील मुलांच्या ८० – ८५ टक्के गुणांइतक्याच मोलाचे असतात. संस्थेतर्फे एकलव्य सक्षमीकरण उपक्रमांतर्गत ठाणे महानगर पालिकांच्या शाळांतील अशा वंचित मुलांना ९ वी इयत्तेतच निवडून त्यांना १० वीत गणित, इंग्लिश, विज्ञान, मराठी अशा विषयांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आयपीएच संस्थेकडून खास व्याख्याने घेतली जातात. त्याच बरोबर संस्थेतर्फे चालणार्‍या पुस्तक पेढी, समता संस्कार शिबीर, क्रिडास्पर्धा, ईद – दीपावली स्नेह संमेलन, सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला, नाट्यजल्लोष आदि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांना सामील करून घेतले जाते त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांना चांगले विचार ऐकण्यास मिळतात, त्यांच्या सर्वांगिण विकासाला दिशा मिळते आणि त्यांची सामाजिक जाण वाढीस लागते.


एकलव्य सक्षमीकरण योजनेतील मुलांचे उत्कृष्ट निकाल
या वर्षी ठाणे महानगर पालिकेच्या कळवा, मानपाडा, शाळा नं. १८ आणि कळवा रात्र शाळा या शाळांमध्ये मुलांना एकलव्य सक्षमीकरणाखाली मार्गदर्शन करण्यात आले. योजना राबविलेल्या शाळांमधील, योजनेत सामील विद्यार्थ्यांपैकी 95% विद्यार्थी यंदा यशस्वी झाले.  एकूण ४५ मुलांना फर्स्ट क्लास मिळाला असून एका मुलीला ९० % हून अधिक तर ९ मुलांना ८० टक्क्यांच्यावर मार्क्स मिळाले आहेत. कळव्याच्या शाळेतील राहुल माने हा मुलगा ७६ टक्के मिळवून शाळेत पहिला आला आहे. या मुलाच्या घरी माकडाचे खेळ करून घर चालवतात, अशी माहिती एकलव्य सक्षमीकरण योजनेच्या संयोजक लतिका सु. मो. यांनी दिली. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या विदारक आर्थिक सामाजिक स्थिती विषयी सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले की, १७ विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील किंवा दोघेही हयात नाहीत, ८ विद्यार्थी स्वतःच दहावीत शिकत असतांना काम करीत, स्वतःचा छोटा व्यवसाय करणारे पालक ११ जण आहेत, ५९ पालक मोल मजुरी करणारे आहेत, ४३ विद्यार्थ्यांची आई घर काम करते, १४ पालक सफाई कामगार, १२ जणांचे वडील रिक्षा ड्राइवर तर ८ जणांचे वडील वॉचमन आहेत.


एकलव्यांना शैक्षणिक मदतीसाठी एकलव्य दत्तक योजना
कोविडच्या काळात या मुलांच्या घरची परिस्थिती आणखीनच बिघडली. कुटुंबाची जी काही तुटपुंजी मिळकत होती ती ही थांबली. अशा वेळी संस्थेने मोफत रेशन पुरवून या कुटुंबांची मदत केली. या कठीण आर्थिक संकटामुळे या मुलांच्या पुढील शिक्षणाचे भवितव्यही अंधारून आले आहे. यासाठी संस्थेने थेट शैक्षणिक निधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एकलव्य दत्तक योजना सुरू केली आहे. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे ही आजच्या काळाची गरज आहे. संवेदनशील नागरिकांनी तसेच संस्थेच्या हितचिंतकांनी एकलव्य गौरव पुरस्कार हा कार्यक्रम संस्थेच्या फेसबूक पेजवर नक्की बघावा आणि एकलव्यांना उदारहस्ते मदत करावी असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, सचिव हर्षलता कदम, विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ आणि जगदीश खैरालिया यांनी केले आहे. 

Web Title: Eklavya Gaurav Award Ceremony at the hands of Dilip Prabhavalkar on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.