Eknath Shinde: बाबा शिवसेना सोडणार नाहीत! श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:58 AM2022-06-23T09:58:37+5:302022-06-23T10:00:16+5:30
Eknath Shinde: राज्यात शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही किंवा ते सोडणारही नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- अजित मांडके
ठाणे : एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी बुधवारी भेट घेऊन तासभर चर्चा केली. राज्यात शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही किंवा ते सोडणारही नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे यांचे बंड थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना मंगळवारी सुरतला पाठविले होते. त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर ते दोघे परत आले. त्यानंतर, बुधवारी फाटक यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी बंड शमविण्याबाबत चर्चा केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच त्यांची मनधरणी केली. श्रीकांत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत काही बोलण्यास नकार दिला असला, तरी शिवसेना-भाजपची युती व्हावी, अशी आशा व्यक्त केल्याचे फाटक यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी करणे अयोग्य होते. असेही त्यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान शिंदे हे शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिवसेनेतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातही शिंदे यांनी काही चुकीच्या मागण्या केलेल्या नसून त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि त्यांच्यासकट सर्व आमदार शिवसेनेत राहोत हीच इच्छा असल्याचे फाटक यांनी सांगितले.