एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार?; ठाणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:20 AM2019-10-30T00:20:46+5:302019-10-30T06:28:16+5:30

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत

Eknath Shinde Claimant for Deputy Chief Minister ?; Discussion everywhere in Thane district | एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार?; ठाणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार?; ठाणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा

Next

ठाणे : भाजप-शिवसेना यांच्यातील वाटाघाटीत उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास या पदावर पहिला अधिकार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा असेल, मात्र त्यांनी ही जबाबदारी लागलीच स्वीकारण्यास नकार दिला तर एकनाथ शिंदे हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे यावेळी उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेतेपदावर ठाण्यातील नेते आपले नाव कोरणार, अशी ठाणेकरांना आशा वाटत आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेत तणावाचे वातावरण आहे. परंतु, उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले जाऊ शकते. वरळीत विजयी झालेले आदित्य ठाकरे यांचाच या पदावर पहिला दावा असेल. मात्र संसदीय राजकारणात नवखे असलेल्या आदित्य यांनी लागलीच ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला तर शिंदे यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, देसाई यांचे वय व त्यांचे विधान परिषदेचे सदस्य असणे हे अडसर ठरू शकते.

मागील मंत्रिमंडळात विधानसभेतील सदस्यांना डावलून विधान परिषदेतील सदस्यांना महत्त्वाची खाती दिल्याने शिवसेनेत असंतोष निर्माण झाला होता. यावेळी ही चूक सुधारायची असेल तर शिवसेना नेतृत्त्व देसाई यांच्याऐवजी शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करील, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. शिंदे हे आक्रमक आहेत व त्यांच्याकडे इतरांना निवडून आणण्यासाठी रसद पुरवण्याची क्षमता आहे. आदित्य ठाकरे हे विधिमंडळातील शिवसेनेचे गटनेते होणार असतील तर देसाई यांच्यापेक्षा शिंदे यांच्याबरोबर काम करणे आदित्य यांना अधिक मोकळेपणाचे वाटू शकते.

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक यामध्ये शिंदे यांनी आपले कसब पणाला लावले. सुमारे १५ आमदारांना त्यांनी निवडणुकीत बळ दिल्याचे बोलले जाते. ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिंदे यांचे फडणवीस यांच्यासोबत चांगले संबध असल्याने त्यांच्याच नावाचा अधिक विचार केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे येणार आहे. ज्येष्ठतेनुसार अजित पवार यांच्याकडे हे पद येऊ शकते. २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ येऊनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद सोडले, याचे शल्य अजित पवार यांच्या मनात आहे व ते त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले. आता विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा राष्ट्रवादीकडे येत असेल तर अजित पवार हे त्याचे दावेदार ठरु शकतात.
मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव करुन जाएंट किलर ठरलेले व विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून चमकदार कामगिरी बजावलेले धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अर्थात धनंजय हे विधानसभेत नवखे आहेत. शरद पवार यांचे अनेक जुनेजाणते साथीदार त्यांना सोडून जात असताना त्यांच्यासोबत राहिलेल्यांपैकी छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड हे पुन्हा विधानसभेत दाखल झालेले आहेत. परंतु, भुजबळ यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ आहे. मात्र आव्हाड हे आक्रमक असून वर्षानुवर्षे पवार यांचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे कदाचित जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते.त्यामुळे ठाण्याच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद किंवा विरोधी पक्षनेतेपद यापैकी काय येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

संजय केळकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान?
मुंबई पाठोपाठ १८ विधानसभा मतदारसंघ ठाण्यात असून मुंबईत राष्ट्रवादी क्षीण असली तरी ठाणे जिल्ह्यात पक्षाची स्थिती तुलनेनी बरी आहे. भविष्यात पक्षाला वाढीकरिता मुंबईपेक्षा ठाणे जिल्ह्यात संधी असू शकते. त्यामुळे ठाण्याला संधी देण्याचे तेही एक कारण असू शकते.

दुसरीकडे ठाण्यातून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह भाजपचे आमदार संजय केळकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. सरनाईक हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत तर केळकर यांनी ठाण्याचा गड पुन्हा सर केला आहे. डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले मुरबाड मतदारसंघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांचीही मंत्रीपद मिळण्याची इच्छा आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला महत्त्वाची खाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Eknath Shinde Claimant for Deputy Chief Minister ?; Discussion everywhere in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.