एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 10, 2023 05:30 PM2023-05-10T17:30:03+5:302023-05-10T17:31:14+5:30

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आज रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ब संघाचा कर्णधार चिन्मय सुतारने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

Eknath Shinde Cricket Club B team's hat trick for the title | एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक

googlenewsNext

ठाणे : रोमहर्षक सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने आपल्याच अ संघाला सहा विकेट्सनी मात देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी -२० लीग क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. अ संघाने दिलेले २१३ धावांचे आव्हान ब संघाने १९.१ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात २१४ धावा करत स्पर्धेतले आपले वर्चस्व कायम राखले.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आज रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ब संघाचा कर्णधार चिन्मय सुतारने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पण अ संघाच्या अखिल हेरवाडकर आणि जपजित रंधवाने पहिल्या विकेटसाठी दिडशतकी भागीदारी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. या दोघांनी ८२ चेंडूत १५१ धावांची भागीदारी करत ब संघाच्या गोलंदाजना विकेट मिळवण्यासाठी घाम गाळायला लावला. अखिलने ४९ चेंडूत सात चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत ९४ धावा केल्या. तर जपजितने ७७ धावांचे योगदान देताना सहा चौकार आणि चार षटकार मारले. अमित पांडेने ४१ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. धृमिल मटकर आणि हेमंत बुचडेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना साहिल गोडे आणि विकी पाटीलने पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत ब संघाला तेवढीच दमदार सुरुवात करून दिली. साहिलने ६१ धावांची खेळी केली.

साहिल बाद झाल्यावर विकी पाटीलने कर्णधार चिन्मय सुतार आणि अर्जुन शेट्टीसोबत संयमी फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला. मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या विकी पाटीलने संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना ५२ चेंडूत नाबाद ९३ धावा केल्या. विकीने या खेळीत सात चौकार आणि पाच षटकार मारले. अर्जुन शेट्टीने २९ आणि चिन्मयने १९ धावा केल्या. विद्याधर कामत, हर्षल सोनी, निपुण पांचाळ आणि अखिल हेरवाडकरने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक भूषण भोईर, परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
------------------------------------------------------------
संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : अखिल हेरवाडकर ९४, जपजित रंधवा ७७, शशिकांत कदम १६, अमित पांडे ४-४१-३, धृमिल मटकर ४-२६-१, हेमंत बुचडे ३-३२-१) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : १९.१ षटकात ४ बाद २१४ (साहिल गोडे ६१, विकी पाटील नाबाद ९३, अर्जुन शेट्टी २९, चिन्मय सुतार १९, विद्याधर कामत ४-३३-१, हर्षल सोनी ३-३८-१, निपुण पांचाळ २.१-२९-१, अखिल हेरवाडकर २-२२-१).
------------------------------------------------------
सर्वोत्तम फलंदाज - साहिल गोडे.
सर्वोत्तम गोलंदाज - सिध्दांत सिंग.
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक - चिन्मय सुतार.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू - अखिल हेरवाडकर.

Web Title: Eknath Shinde Cricket Club B team's hat trick for the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे