एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव, सेना नेतृत्वाच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:28 AM2017-12-11T06:28:37+5:302017-12-11T06:29:02+5:30
विधानसभेच्या निवडणुकीस जेमतेम दोन वर्षे बाकी असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची आॅफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विधानसभेच्या निवडणुकीस जेमतेम दोन वर्षे बाकी असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची आॅफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याऐवजी विधानसभेचे सदस्य असलेल्या सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांची पसंती आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडून पक्ष स्थापन केलेले बंडखोर नेते नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेचा सक्त विरोध आहे. राणे रालोआत आल्यापासून उद्धव ठाकरे हे प्रचंड आक्रमक झाले असून शेतकºयांच्या प्रश्नांपासून अनेक मुद्द्यांवर दररोज सरकारला धारेवर धरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जाहीर सभांमध्ये तर ठाकरे यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षामधील हे वाद पुढील दोन वर्षे असेच सुरू राहिले, तर विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, हे हेरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची आॅफर केली आहे. मात्र, एमआयडीसीच्या जमीन घोटाळ्यात अडकलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उपमुख्यमंत्री करण्यास मुख्यमंत्री अनुकूल नसून त्यांचा कल शिंदे यांच्याकडे आहे. तसे सूतोवाच त्यांनी उद्धव यांच्याकडे केल्याचे समजते. याखेरीज, कामगार व तत्सम एकदोन खाती शिवसेनेकरिता सोडण्याची भाजपाची तयारी आहे.
देसाई चौकशीच्या फेºयात अडकले असल्याने त्यांना हे पद देऊ नये, अशी स्वच्छ कारभाराचा आग्रह धरणाºया मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. तसेच विधान परिषदेतील सदस्यांना मंत्रीपदे दिल्याने अगोदरच शिवसेनेत अस्वस्थता असल्याने अखेरच्या दोन वर्षांत विधानसभेतील सदस्यांना संधी देण्याचा विचार शिवसेना करू शकते, असा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना वाटतो.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळूनही बहुमत प्राप्त झाले नाही. शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला व एकनाथ शिंदे यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिले. शिंदे हे औटघटकेचे विरोधी पक्षनेते ठरले. कारण, लागलीच शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. सरकारमध्ये सामील झाल्यावर मात्र पराभूत देसाई यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद बहाल करण्यात आले आणि गटनेतेपद देण्यात आले. लोकांमधून निवडून आलेल्या अनेक सदस्यांना ही बाब रुचलेली नव्हती.
नव्या सत्ताकेंद्राला विरोध?
शिवसेनेच्या स्थापनेपासून व स्व. आनंद दिघे हयात असतानाही ठाणे महापालिकेत शिवसेनेला स्वबळावर सत्ता प्राप्त झाली नव्हती. ती या वेळी शिंदे यांनी मिळवून दिली. मात्र, शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास त्यांचे पक्षातील महत्त्व वाढेल व नवे सत्ताकेंद्र पक्षात निर्माण होईल, असा उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये मतप्रवाह आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून मिलिंद नार्वेकर यांनी काम केल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले व त्यांनी आपली नाराजी शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याची चर्चा सर्वदूर पसरण्यामागे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही आॅफर व त्याला ठाकरे यांच्या काही निकटवर्तीयांचा असलेला विरोध हेच कारण आहे, असे समजते.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाची मला काहीही माहिती नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली असल्यास त्याचीही कल्पना नाही.
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम)