एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

By अजित मांडके | Published: October 3, 2023 08:56 AM2023-10-03T08:56:56+5:302023-10-03T08:57:34+5:30

ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत.

Eknath Shinde group wants 'Shiv Sena Thane'; Urges for Lok Sabha; What will happen to Kalyan Lok Sabha? | एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

googlenewsNext

अजित मांडके

ठाणे : ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत. परंतु, शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाणे लोकसभेवर दावा केल्याने आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसेनेला ‘ठाणे’ दिल्यास ‘कल्याण’ लोकसभेचे काय?, असा सवालही केला जात आहे.

ठाणे शिवसेनेला दिले तर कल्याणवर भाजप आपला दावा आणखी मजबूत करण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपकडून ठाणे लोकसभेसाठी अनेक संभाव्य उमेदवारांची नावे पुढे असताना शिवसेनेने दावा केल्याने त्यांच्याकडून कोणता चेहरा पुढे आणला जाणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी आजही स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यात ठाणे व कल्याण लोकसभादेखील ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात आता आनंद परांजपे यांचे नावही पुढे आले आहे. परंतु, ते सध्या राष्ट्रवादीत असल्याने ते कोणाच्या तिकिटावर निवडणूक लढणार हे निश्चित नाही.

शिवसेनेकडून हा गड आपल्याच ताब्यात ठेवावा, असे वरिष्ठांना सांगितले आहे. त्यानुसार शिंदे गटानेही आता ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाकडे चांगली ताकद असल्याचा दावा त्यांच्या पक्षातील नेते करीत आहेत. ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. मीरा भाईंदरमध्येही प्रताप सरनाईक यांच्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड दिसत आहे. केवळ नवी मुंबई वगळता इतर दोन ठिकाणी शिवसेना मजबूत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहणार असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीची तयारी आता शिंदे गटानेही सुरू केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, भाजपने त्यावर दावा करू नये, असे आवाहनदेखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

उमेदवारांची चाचपणी

 शिंदे गटाकडे सध्या माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक यासह इतर काही महत्त्वाचे चेहरे आहेत. परंतु, त्यांच्या गळ्यात ही माळ पडेल की, आणखी दुसराच उमेदवार यासाठी तयार केला जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपच्या मतांमुळेच शिवसेनेचे राजन विचारे यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. आता दोन गट झाल्याने शिवसेनेच्या मतांमध्येदेखील विभागणी झालेली आहे. परंतु, भाजपची मते स्थिर असल्याने शिंदे गटाला ठाणे लोकसभा देऊ केली, तर भाजपला पुन्हा त्यांना मदत करावी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याणमध्ये भाजपच्या जोर बैठका

 शिवसेनेने ठाण्यावर दावा केला तर कल्याण कोणाकडे जाणार याचीदेखील आता चर्चा रंगू लागली आहे. भाजपने ठाण्याबरोबर कल्याणमध्येही गेल्या काही महिन्यांत जोर बैठका सुरू केल्या आहेत.

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनेक वेळा येथे हजेरी लावली आहे. तसेच इतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील कल्याण, डोंबिवलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही मधल्या काळात या पट्ट्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

 ठाणे जर शिंदे गट मागणार असेल तर कल्याण आपल्याकडे राहावे यासाठी भाजपदेखील येत्या काळात आग्रही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Eknath Shinde group wants 'Shiv Sena Thane'; Urges for Lok Sabha; What will happen to Kalyan Lok Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.