शिंदे गटाचा 'वर' अन् ठाकरे गटाची 'वधू'; ठाण्यात शिवसेना एक झाली, CM शिंदेही हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:18 AM2023-12-22T08:18:32+5:302023-12-22T08:20:02+5:30

राज्यात विशेषत: ठाणे जिल्ह्यात शिंदे-ठाकरे गट एकमेकांचे राजकीय वैरी झालेत. परंतु या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही गटातील नेत्यांचा मिलाप दिसला.

Eknath Shinde group's 'groom' and Uddhav Thackeray group's 'bride'; Shiv Sena united in Thane for marriage | शिंदे गटाचा 'वर' अन् ठाकरे गटाची 'वधू'; ठाण्यात शिवसेना एक झाली, CM शिंदेही हजर

शिंदे गटाचा 'वर' अन् ठाकरे गटाची 'वधू'; ठाण्यात शिवसेना एक झाली, CM शिंदेही हजर

ठाणे - २०२२ मध्ये राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदार, १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून वेगळी चूल मांडली. शिंदे सरकारमध्ये गेले तर ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. राज्यातील या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेत २ गट पडले. खरी शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी आजही शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून केला जातो. शिंदे-ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाही. राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले असले तरी ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात एका विवाहाची चर्चा जोरदार चालू आहे.

हा विवाह म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्भव ठाकरे गटाचा असून यानिमित्ताने दोन्ही गटातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते एकत्र येताना दिसून आले.आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक Adv. आरती खळे यांचा शुभ विवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला. यावेळी दोन्ही गटाचे सूर जुळलेले पाहायला मिळाले. या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नाशिक संघटक हेमंत पवार तर ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खासदार राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि स्थानिक शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र एकाच ठिकाणी आल्याने पाहायला मिळाले आहे.

राज्यात विशेषत: ठाणे जिल्ह्यात शिंदे-ठाकरे गट एकमेकांचे राजकीय वैरी झालेत. परंतु या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही गटातील नेत्यांचा मिलाप दिसला. एकमेकांशी हसतखेळत गप्पा रंगल्या. जेवणाच्या पंगतीही एकत्र बसल्या. कुणी हातात हात देत तर कुणी एकमेकांना टाळी देत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे लग्न सोहळ्यात का होईना पण शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले आणि शिवसेना एकच झाली असेच चित्र या लग्नानिमित्त ठाणेकरांना दिसून आले.  
 

Web Title: Eknath Shinde group's 'groom' and Uddhav Thackeray group's 'bride'; Shiv Sena united in Thane for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.