वाहतुकीचे नियोजन करणार तीन जिल्ह्यांची कोऑर्डिनेशन टीम, एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:23 PM2021-09-29T18:23:18+5:302021-09-29T18:23:51+5:30
Thane : मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणो मार्गे पुढे जात होती.
ठाणे : ठाण्यातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आता नाशिक वरुन येणा-या वाहनांसाठी गर्दीच्या वेळेस पार्किंग लॉटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन टप्याटप्याने ही वाहने सोडली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, या वाहतुकीचे नियोजन, नियमन करण्यासाठी ठाणो, पालघर, रायगड यांची एक कॉर्डीनेशन टिम तयार करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी शिंदे यांनी नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहाणी केली. तसेच कोण कोणत्या ठिकाणी पार्कीग लॉट उपलब्ध होऊ शकतात. याची माहिती देखील त्यांनी घेतली. ठाणो शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूककोंडीत भर पडत आहे.
मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणो मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरु स्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्कीग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील या पाहणी दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिली.
जेएनपीटीतून निघणारी वाहने ही अधिकची आहेत, ती आता पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत, तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी, अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी, ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील, जेणोकरून वाहतुकीचे नियोजन करणो शक्य होईल त्यासाठी ही कोऑर्डिनेशन टीम काम पाहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पार्किंग लॉटसाठी जेएनपीटीमधील ५० हेक्टर, दास्तान फाटा १०० हेक्टर जमीन आहे, तसेच इतर ठिकाणी देखील पार्किंग लॉट तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक वरुन येणारी वाहने थेट रस्त्यावर येतात, त्यामुळे पार्किंग लॉट तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोनाळे, दापोडे येथे पार्किंग लॉट तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचे काम आता वेगाने सुरु असून लवकरच ते पार्किंगसाठी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच ठाण्यावर वाढलेला वाहतूक कोंडीचा ताण हा येत्या काही दिवसात कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.