"ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, म्हणून ठाण्याचा विकास वेगान होईल"
By जितेंद्र कालेकर | Published: January 22, 2023 11:13 PM2023-01-22T23:13:16+5:302023-01-22T23:13:25+5:30
टेंभीनाका येथील जैन मंदिरात आयोजित धार्मिक महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली.
ठाणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांपासून राज्यातच नाही, तर देशभरातही विविध कार्यक्रमांना हजेरी लावतो. ठाण्याच्या कार्यक्रमात एक विशेष बाब जाणवते. ठाण्यातील कार्यक्रमात आगळेवेगळे प्रेम, आदर आणि विश्वास दिसतो. त्यातच हे शहर सुरक्षित असल्याने येथे मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग येऊन वसला आहे. आता ठाण्याचे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने ठाणे शहराचा विकास हा आणखी वेगाने होईल, यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात केले.
टेंभीनाका येथील जैन मंदिरात आयोजित धार्मिक महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. यावेळी जैन बांधवांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा पगडी आणि मानपत्र देऊन सन्मान केला. जैन बांधवांनी समाजाला शाळा उभारायची असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आपण महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आरक्षित भूखंड देण्याबाबत सूचना करू, असे आश्वासन दिले. दिवंगत आनंद दिघे यांचे जैन समाजावर विशेष प्रेम होते, अशीही आठवण करून दिली. धर्मवीर चित्रपट पाहिला का, असेही त्यांनी विचारले. जैन समाज हा ठाणे शहराच्या विकासात नेहमी पुढे होता. कोरोनाकाळातही या समाजाने मोठे योगदान दिल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.