उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
By सदानंद नाईक | Published: September 28, 2024 06:33 PM2024-09-28T18:33:15+5:302024-09-28T18:35:05+5:30
गेली ३५ वर्ष पप्पू कलानी व कुमार आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले आहेत
सदानंद नाईक, उल्हासनगर: कलानी व आयलानी यांना आवाहन देत शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दंड थोपटले. कलानी व आयलानी यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षात केलेला विकास दाखवा, असे आवाहन शहरवासीयांना चौधरी यांनी केले.
उल्हासनगरचे सलग २० वर्ष आमदार राहिलेल्या पप्पु कलानी यांचा २००९ साली भाजपचे कुमार आयलानी यांनी पराभव करीत सर्वांना धक्का दिला. तर ज्योती कलानी यांनी सन-२०१४ साली कुमार आयलानी यांचा मोदी लाटेत पराभव करून विजय मिळविला. तर सन-२०१९ साली कुमार आयलानी पुन्हा आमदार पदी निवडून आले. त्यांनी ज्योती कलानी यांच्यावर निसटता विजय मिळविला. म्हणजे गेली ३५ वर्ष कलानी व आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले. पुन्हा आयलानी व कलानी यांच्या लढतीकडे पाहिले जाते. मात्र यावेळी आयलानी यांच्यापुढे स्वपक्षातील प्रदीप रामचंदानी, महेश सुखरामानी, जमनुदास पुरस्वानी यांनी आवाहन उभे केले. तर मित्र पक्ष असलेल्या शिंदेंसेनेचे माजी महानगरप्रमुख व मराठी चेहरा असलेले राजेंद्र चौधरी यांनीही दंड थोपटले.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ओमी कलानी यांनी निवडणूक वाढविण्याचे जाहीर केले. दरम्यान रिपाइं आठवले गटतून हकालपट्टी झालेल्या भगवान भालेराव यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मीच असेल, असे संकेत दिले. नेहमी प्रमाणे आयलानी व कलानी भोवती फिरणारी निवडणूक यावेळी राजेंद्र चौधरी व इतर चेहऱ्या भोवती फिरत आहेत. गेल्या ३५ वर्षात आयलानी व कलानी यांनी शहराचा विकास केला नसल्याने, शहरातून सिंधी समाजासह इतर समाज पलायन करीत असल्याची माहिती दिली. शहराला वेगळी ओळख देण्यासाठी शहरवासीयांनी यावेळी वेगळ्या चेहऱ्याचा विचार करावा. असे चौधरी म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी व उल्हासनगरातून आयलानी ऐवजी शिंदेंसेनेला तिकीट मिळायला हवे. पक्षाकडे तिकीट मागितले असून पक्षाने विश्वास दाखविल्यास ते सार्थ ठरविणार असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.