शिवसेनेच्या 'वैद्यकीय मदत मार्गदर्शक' ग्रंथाचे प्रकाशन, उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:47 PM2019-09-11T21:47:32+5:302019-09-11T22:19:10+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला ग्रंथ
ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. शहरातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रंथ प्रकाशनसोहळा पार पडला. आरोग्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने माहिती संपादित करून हा ग्रंथ साकारला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या समाजभिमुख राजकारणाचा वसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजकारणाचा वारसा ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटले. "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथ समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी दिशादर्शक आणि उपयुक्त ग्रंथ ठरेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" या ग्रंथासाठी मेहनत घेतलेल्या खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांचेही उद्धव ठाकरेंनी विशेष अभिनंदन केले.
तर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांसाठी तसेच नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, गोरगरीब गरजू रुग्ण किंबहुना समाजातील प्रत्येक घटकासाठी "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" हा ग्रंथ दिपस्तंभ ठरेल अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाचे संपादन केलेल्या खा डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या आरोग्य विषयक उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वर्षभराच्या परिश्रमानंतर "वैद्यकीय मदत मार्गदर्शक" ग्रंथ साकारला असुन या ग्रंथात गोरगरीब गरजू रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि विविध ट्रस्ट कडून आर्थिक मदत कशी मिळविता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
काय आहे शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथात?
1) राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालये (चॅरिटी हॉस्पिटल्स )
2) राज्यातील सर्व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असलेली रुग्णालये,
3) राज्यातील सर्व रक्त पेढ्या(ब्लॅक बँक)
4) गोरगरीब गरजु रुग्णांना मदत करणार्या ट्रस्टची यादी.
5) राज्यातील सर्व धर्मशाळा यांची यादी.
6) राज्यातील सर्व अनाथ आश्रमे व बालकाश्रम़ाची यादी.
7) गरजु रुग्णांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज कसा दाखल करावा त्याची संक्षिप्त माहिती.
8) त्याचबरोबर सिद्धिविनायक ट्रस्ट आणि देणगी देणाऱ्या विविध ट्रस्ट कडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज कसा दाखल करावा त्याची संक्षिप्त माहिती.
9) केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य विषयी विविध योजनांची माहिती.
10) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची ( सिव्हिल हॉस्पिटल्स) / जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती व संपर्क क्रमांक.