एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 08:39 AM2022-09-12T08:39:09+5:302022-09-12T08:41:42+5:30
दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली.
अजित मांडके
ज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता शिंदे सेना आणि मनसे महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचेही बोलले जाते. ठाणे जिल्ह्यात तसे झाल्यास शिंदे सेनेमुळे मनसेला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. मागील कित्येक वर्षे पिछाडीवर असलेल्या मनसेला ठाण्यात नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मरगळलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. आता दसरा मेळाव्यावरून ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. येत्या महापालिका निवडणुका शिंदे सेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत. तसे झाल्यास मरगळलेल्या मनसेला नवसंजीवनी मिळेल. मागील काही वर्षे मनसे केवळ भाषणापुरती मर्यादित राहिल्याचे दिसते. परंतु, काही महिन्यांपासून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले, त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला आणि त्याचे परिणामही दिसून आले. यातून मनसेचे पदाधिकारी पुन्हा एकदा कामाला लागले.
ठाण्यात मनसेची स्थापना झाल्यानंतर २००७च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक पालिकेवर निवडून गेले होते. विधानसभा निवडणुकीतही मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र, २०१२ मध्ये मनसेचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. त्यावेळेस मनसेचे केवळ तीन नगरसेवक पालिकेवर गेले होते. २०१७च्या निवडणुकीत मनसेला ठाण्यात भोपळासुद्धा फोडता आला नव्हता. त्यानंतर मनसे ठाण्यात पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसले. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेला उघडउघड मदत केली. शिवसेनेने छुपी मदत केल्याने मनसेला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली होती. शिंदे यांच्याकडे संघटन कौशल्य असले तरी करिष्मा नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा शिंदे यांच्या संघटन कौशल्यात साखरेसारखा विरघळून ठाण्यात शिवसेनेकरिता यशाचा दुग्धशर्करा योग जमून येत होता.
उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावल्यामुळे शिंदे यांना ‘ठाकरे’ आडनावाचा करिष्मा लागला तर ती गरज राज ठाकरे पूर्ण करतील, अशी कदाचित त्यांची अपेक्षा आहे. शिंदे व राज हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा आपण पाठपुरावा करीत असल्याचे सांगतात. त्यामुळे शिंदे यांना ठाकरेंचा करिष्मा मिळेल व मनसेला सत्ताधारी पक्षाकडून रसद प्राप्त होईल.