संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:23 PM2022-06-27T13:23:38+5:302022-06-27T13:24:16+5:30
कोर्टातली लढाई आम्ही चांगल्याप्रकारे जिंकू, सगळे आमदार एकत्र बसून पुढचे निर्णय घेतील असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
ठाणे - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे ८ मंत्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. मात्र शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिकविरुद्ध शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांसमोर रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यात आज शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. आनंद आश्रम येथे शिंदे समर्थकांनी गर्दी करत संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी आहे. जे आमदार शिंदे गटात सहभागी झालेत त्यापैकी कुणीही शिवसेना सोडली आहे असं म्हटलं नाही. सगळेच शिवसैनिक आहे. संजय राऊतांनी विचार करून बोलावं. महाराष्ट्रातील जनता सर्वकाही बघत आहे. माणसाच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यावर अशी विधानं केली जातात. येणाऱ्या भविष्यात जनता उत्तर दिले येईल. राऊतांच्या तोंडातून जे काही पडते त्याला उत्तर देण्यास रस नाही. त्यांनी पोकळ धमक्यांना दुसऱ्यांना द्याव्यात असं आव्हान दिलं आहे.
कोर्टातली लढाई आम्ही चांगल्याप्रकारे जिंकू, सगळे आमदार एकत्र बसून पुढचे निर्णय घेतील. संजय राऊतांना ईडीकडून समन्स आले असेल तर त्यांना शुभेच्छा अशाप्रकारे टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे हे शिवसैनिक आहेत. शिंदे समर्थक नाही. दिघे साहेबांनी जो विचार ठाणेकरांना दिला. वेगळा विचार लोकांच्या मनात पेरला आहे. दिघे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या बाजुने आहे. या सर्वाला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहे. शिवसैनिकांना काम करू दिले जात नव्हते. निधीवाटप होत नाही. महाविकास आघाडी अल्पमतात आले आहे. याचिकेत पाठिंबा काढल्याचं म्हटलं आहे. आतातरी आमदार आहेत. भविष्यात जे लोकांना अपेक्षित आहे. चांगले सरकार महाराष्ट्रात आले पाहिजे अस श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता शिंदे समर्थक आणि ठाकरे शिवसैनिक यांच्यात रस्त्यावरची लढाई पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.