ठाणे जिल्ह्यातील जलसाठे विकसीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:23 PM2022-03-13T15:23:10+5:302022-03-13T15:23:48+5:30
मुरबाडच्या खेवारेजवळील आरव जलसिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि ग्रामीण भागातील पाझर तलाव, जलसाठे विकसीत करण्यासाठी शासकीय निधीच्या माध्यमातून कमी खर्चाच्या शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे या तलावांमध्ये पाणी साठा वाढून त्याचा वापर शेतीसाठी करणे शक्य होईल, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री. एकनाथ शिंदे यांनी केली.
मुरबाड तालुक्यातील खेवारे आरव जलसिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, माजी आमदार दिगंबर विशे, वसुंधरा मंडळाचे संस्थापक आनंद भागवत, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उद्योजक विश्वजीत नामजोशी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या पाझर तलावातील पाण्याच्या वापरासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपसा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी साठा वाढून त्याचा वापर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर करता येईल. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी देण्यात आल्याचे सुतोवाच शिंदे यांनी केली.
या तलावात सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा आहे. ज्या तंत्रज्ञानाने पाणी उपसा केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाबरोबरच रब्बीमध्ये दुबार पीके घेता येतील. या तलावातील पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी हळद, भेंडी, मिरची या सारखे पीके घेऊन उत्पादन वाढवावे,असे आवाहनही शिंदे यांनी केले.
या पाझर तलावासाठी पाणी साठा वाढविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात यावा. तसेच परसिरातील शेतकऱ्यांचा समुह करून मोठ्या प्रमाणावर एकाच पिकाची लागवड करावी जेणेकरून पिकांचं क्लस्टर तयार होऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. यासाठी शासकीय योजनांमधूनही निधी मिळेल. शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी अपेक्षा ही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
ग्रामीण भागातील असलेले तलाव, जलस्त्रोतातील पाणी साठा वाढविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी त्याचे संवर्धनाचे काम झाले पाहिजे त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.यावेळी माजी आमदार विशे, डॉ. विलास सुरोसे, वाघ, नामजोशी, यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रकल्पासाठी शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारे आयआयटीचे प्रा.डॉ, प्रदीप काळबर, संदीपक अध्यापक, प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य करणारे नामजोशी, डॉ. सुरोसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आनंद भागवत यांनी आभार मानले.