...तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? महिला पदाधिकाऱ्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 08:40 PM2022-06-28T20:40:00+5:302022-06-28T20:54:27+5:30
महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंचे समर्थन करत आम्ही शिवसेनेतच असल्याचं म्हटलंय.
ठाणे - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यभरात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांचा निषेध केला जात आहे. तोडफोड, पुतळे जाळले जात आहेत. तर, शिंदे समर्थकांविरुद्ध रोष दिसून येत आहेत. त्यातूनच, शिवसेनेनं ठाणे जिल्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे, महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात शिंदे समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. ठाण्यात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश होता. मात्र, म्हस्के यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ राजीनामा दिला. तर शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे पक्षविरोधी कारवायाचं कारण देत ठाणे जिल्हासंघटक मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यावरुन, महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंचे समर्थन करत आम्ही शिवसेनेतच असल्याचं म्हटलंय.
टाळा लावायला कोण ठेवणार?
शिवसेना जिल्हा संघटक पदावरुन आज माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ठाण्यातील महिला शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशाप्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही आणि बातम्यांमधून दाखवलेलं पत्र अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. हकालपट्टी हा शब्द हास्यास्पद असून तुम्ही अशाप्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल तर शिवसेना शाखेला टाळा लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? असा सवाल ठाणेच्या शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी विचारला आहे.
नासका आंबा आहे, तोच पक्षातून काढा
आम्ही आमच्या एकनाथ शिंदेंमुळे आहोत आणि पुढेही राहु. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात येऊन आपला विरोध दर्शवला. यावेळी, त्यांनी पक्षाकडून झालेल्या कारवाईचा निषेध करत संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत. युवती सेना विस्तार नम्रता भोसले जाधव यांनी नाव न घेता शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊतांना टोला लगावला. शिवसेनेतून इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा एकच नासका आंबा आहे, तोच काढा. जर तुम्ही सगळ्या शिवसैनिकांची हकालपट्टी करणार असाल तर, शाखेला निदान २ तरी लोक टाळे मारायले ठेवा, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, याबाबतचं पत्र शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.