कमळ फुलले तरच कार्यकर्त्यांना आनंद, सत्तेचा छोटा वाटा नको, विरोधक शिवसेना की राष्ट्रवादी, याबाबत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:53 AM2022-06-22T06:53:44+5:302022-06-22T06:54:35+5:30
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाणे महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलेल. मात्र, शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली तर सत्तेच्या छोट्या वाट्यावर समाधान मानावे लागेल, असे भाजपचे माजी नगरसेवक खासगीत बोलत आहेत.
ठाणे : एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाणे महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलेल. मात्र, शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली तर सत्तेच्या छोट्या वाट्यावर समाधान मानावे लागेल, असे भाजपचे माजी नगरसेवक खासगीत बोलत आहेत.
प्रभाग रचनेच्या मुद्यावरून ठाण्यात आरोप-प्रत्यारोप केले जात होते. किंबहुना आपल्या फायद्यासाठी शिवसेनेने प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप भाजपने केला होता. प्रभाग रचनेनंतर पालिकेवर पुन्हा भगवा फडकणार हेच मतदारांच्या मनावर ठसवण्याकरिता महापालिका मुख्यालयावर दोन भगवे झेंडे आणि प्रवेशद्वारावर वाघाचे चित्रही लावण्यात आले.
महापालिकेत सध्या शिवसेनेचे ६७ संख्याबळ आहे. आगामी निवडणुकीत संख्याबळ ९० पार जाईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात होता. आता शिंदे यांनीच बंड पुकारल्याने त्यांना मानणारे नगरसेवक त्यांच्या सोबत जातील. शिवसेनेत किती नगरसेवक राहतील व किती शिंदे यांच्याबाबत जातील, याबाबत चित्र स्पष्ट नाही.
शिंदे यांचा सामना शिवसेना की राष्ट्रवादीसोबत
ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगत होता. आत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा भाजपसोबत युती केली तर त्यांचा सामना शिवसेनेविरुद्ध की राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध होणार याचे कुतूहल राजकीय वर्तुळात आहे.
समजा शिंदे यांच्या दबावामुळे भाजप-शिवसेना युती झाली तर कालपर्यंत एकत्र असलेले शिंदे व जितेंद्र आव्हाड निवडणुकीत परस्परविरोधी उभे असलेले दिसतील.
शिंदे बंडाच्या वावटळीने भाजपमधील इच्छुक गारठले
ठाणे : शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याने ठाण्यात शिवसेनेच्या विरोधात सातत्याने उभे राहून संघर्ष करणाऱ्या भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे. शिंदे भाजपसोबत आले किंवा भाजपमध्ये सामील झाले तरी भाजपच्या जुन्याजाणत्यांना आता शेवटच्या बाकावर तर बसावे लागणार नाही ना, अशी भीती अनेकांनी बोलून दाखविली.
शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये आले तर येथे भाजपने बाळसे धरल्यासारखे दिसेल. मात्र शिंदे हे चतुर राजकारणी असल्याने ते आपल्या व आपल्या समर्थकांच्या लाभाकरिता भाजपचा वापर करतील, अशी शंका भाजपची मंडळी व्यक्त करीत आहेत. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे नाते कोणी नाकारू शकत नाही.
त्यामुळे शिंदे यांना भाजप सोबतच्या सत्तेत चांगली पदे व खाती लाभतील. परंतु तसे झाल्यास ठाण्यासह जिल्ह्यातील मूळ भाजपच्या आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासारखे नेते ठाण्यातील शिवसेनेच्या विरोधात गेली अडीच वर्षे संघर्ष करीत आहेत.