ठाणे शहरातून एकनाथ शिंदे रिंगणात?; कोपरी-पाचपाखाडीतून पत्नीला उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:47 AM2018-10-09T00:47:17+5:302018-10-09T00:47:32+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: निवडणूक लढवतील व त्यांच्या विद्यमान कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांची पत्नी लता शिंदे या अर्ज दाखल करतील, अशी माहिती शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

 Eknath Shinde from Thane city; From the Kopri-Panchpakhadi, the wife has the candidacy | ठाणे शहरातून एकनाथ शिंदे रिंगणात?; कोपरी-पाचपाखाडीतून पत्नीला उमेदवारी

ठाणे शहरातून एकनाथ शिंदे रिंगणात?; कोपरी-पाचपाखाडीतून पत्नीला उमेदवारी

Next

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: निवडणूक लढवतील व त्यांच्या विद्यमान कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांची पत्नी लता शिंदे या अर्ज दाखल करतील, अशी माहिती शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे भविष्यात शिंदे पतीपत्नी विधानसभेत, तर पुत्र डॉ. श्रीकांत हे लोकसभेत असे चित्र पाहायला मिळेल, अशी चर्चा आहे.
शिवसेनेत ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील असंतोष उफाळून येऊ नये, याकरिता शिंदे यांनी शहर मतदारसंघातून तर त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव चर्चेत पुढे आला आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. परंतु, मागील निवडणुकीत तो भाजपाने हिसकावून घेतला. त्याचे पडसाद ठाणे महापालिका निवडणुकीतही दिसून आले. त्यामुळे हा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शिंदे हे स्वत: मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
ठाणे शहर मतदारसंघातून मागील निवडणुकीत भाजपाचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव केला. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपाच्या सहा जागा, तर शिवसेनेच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
परंतु, आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने हा मतदारसंघ परत मिळवण्याकरिता शिवसेनेने आपला हुकुमी एक्का रिंगणात उतरवण्याचे ठरवले असल्याचे समजते. या मतदारसंघातून इच्छुकांमध्ये ठामपा सभागृह नेते नरेश म्हस्के, संजय भोईर, देवराम भोईर यांची नावे आघाडीवर होती. म्हस्के यांनी तर हा मतदारसंघ बांधण्यास केव्हापासूनच सुरुवात केली होती. परंतु, भाजपा आपली सर्व शक्ती पणाला लावून हा मतदारसंघ राखण्याचा प्रयत्न करील, असे संकेत प्राप्त झाल्याने शिवसेनेचे ठाण्यातील नाक असलेला शहर मतदारसंघ काबीज करण्याकरिता इच्छुकांना आपल्या राजकीय स्वप्नांना मुरड घालण्यास भाग पाडण्याचे संकेत शिवसेना नेतृत्वाने दिल्याचे कळते.
शिंदे यांचे वलय आणि त्यांची ताकद पाहता, ते सहज या मतदारसंघातून विजयी होतील, असा कयास आहे. शिवाय, शिंदे हेच जर निवडणूक लढणार असतील, तर इतर इच्छुकांना काहीही करून त्यांच्यासाठी काम करावेच लागणार आहे. त्यामुळे नाराजीचा विषय संपुष्टात येतो.
शिंदे यांच्या सध्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिंदे यांचह पत्नी लता यांनाच संधी दिली जाईल, असे संकेत आहेत. सध्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक बॅनर, पोस्टरवर लता शिंदे यांचे फोटो आणि नाव, झळकले आहे. घर सांभाळून शिंदे यांना राजकीय बळ देणाºया लता शिंदे यांना उमेदवारी दिली, तर कार्यकर्ते जीव ओतून काम करतील, असे काहींचे म्हणणे आहे.

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात शिंदे यांचे वर्चस्व तसेच राहावे, यासाठी भाजपासुद्धा प्रयत्न करत आहे, अशी कुजबूज आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात रिपाइंच्या महामेळाव्याला आले होते. तत्पूर्वी ते कोपरीतील भाजपा नगरसेवकाच्या एका कार्यक्रमाला जाणार होते. परंतु, त्यांनी ऐनवेळेस या ठिकाणी जाणे टाळले. याचाच अर्थ भाजपा शिंदेच्या विरोधात फारसा प्रभावशाली उमेदवार देणार नसल्याचे संकेत मानले जात आहे.

Web Title:  Eknath Shinde from Thane city; From the Kopri-Panchpakhadi, the wife has the candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.