एकनाथ शिंदे खेळणार ठाण्यात आनंद दिघे कार्ड, बाळासाहेब व आनंद दिघे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे पाऊल उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:16 AM2022-06-22T11:16:19+5:302022-06-22T11:17:16+5:30
Eknath Shinde: यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन शिंदे यांनी धूर्त खेळी केली.
- संदीप प्रधान
ठाणे : शिवसेनेत बंड करणाऱ्या राज ठाकरे यांनाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले छायाचित्र व नाव वापरण्यास मज्जाव केला होता. नारायण राणे यांनाही बाळासाहेबांनी लक्ष्य केले होते. यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन शिंदे यांनी धूर्त खेळी केली.
शिंदे हे समर्थक आमदारांसोबत सुरत या भाजपच्या गडात जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आपल्या व समर्थक आमदारांच्या मागण्या मान्य करवून घेण्याकरिता शिंदे हे राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवून ते भाजपवर दबाव टाकत असल्याचे ठाण्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये बोलले जात आहे. शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ होते. ठाणे महापालिकेत स्वबळावर शिवसेनेला कधीही सत्ता मिळाली नव्हती. ती शिंदे यांनी मागील वेळी मिळवून दिली. कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्येही त्यांनी सेनेची सत्ता स्थापन केली. लोकांमध्ये पाळेमुळे रुजलेली असतानाही व स्वपक्षीय आमदारांशी दांडगा संपर्क असतानाही अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना डावलले जात असल्याची त्यांना खंत वाटत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातूनही शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न मातोश्रीकडून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेही ते अस्वस्थ होते.
ठाणे शहरातील महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारामुळे पुन्हा यश मिळण्यात अडचण येऊ शकते, असे त्यांना जाणवले होते. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील उच्चभ्रू, मध्यमवर्गीय मतदार शिवसेनेला जवळ करेल किंवा कसे याबद्दल ते साशंक असल्याने त्यांनी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर उचल खात बंड केले. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या भूमिकेची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा गट आपल्या मागे उभा केला. बाळासाहेब व आनंद दिघे यांना अभिप्रेत हिंदुत्वाकरिता आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी जाहीर केले. बाळासाहेब यांचा वारसा थेट ठाकरे यांच्याशी जोडलेला असला तरी आनंद दिघे यांचा वारसा आपल्याशी जोडलेला असल्याने त्यांनी दिघे यांचेही नाव खुबीने वापरले आहे.
धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती करून व दिघे यांच्या यशोगाथेचा कार्यक्रम टीव्हीवरून घराघरात पोहोचला असताना आपल्या राजकीय बंडात आनंद दिघे यांचे नाव वापरणे ही शिंदे यांनी विचारपूर्वक केलेली खेळी असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.