Eknath Shinde Vs Shiv sena: ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही शिवसेनेने केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:31 PM2022-06-28T15:31:05+5:302022-06-28T15:31:34+5:30
Eknath Shinde Vs Shiv Sena: शिंदे समर्थकांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदावरुन नरेश म्हस्के यांची हकालपट्टी केल्यानंतर मंगळवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे - शिंदे समर्थकांच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदावरुन नरेश म्हस्के यांची हकालपट्टी केल्यानंतर मंगळवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता ठाण्यातून अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक पुढे येत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिंदे यांना जाहीर समर्थनही करण्यात आले आहे. परंतु आता अशा बंडोबांचा समाचार घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या नरेश म्हस्के यांची दोन दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्ष विरोधी कारवाया वाढू लागल्याने शिवसेनेकडून ही पावले उचलण्यात येत आहेत. परंतु त्यांच्या जागेवर अद्यापही शिवसेनेकडून दुसरे नाव जाहीर झालेले नाही. या यादीत केदार दिघे आणि सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्या बाबतचा निर्णय अद्यापही शिवसेनेने जाहीर केलेला नाही.
दुसरीकडे शिवसेनेतील महिला गटातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या माजी महापौर तथा जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची देखील आता शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांच्या समर्थकांमध्ये त्या सामील झाल्याने त्यांच्यावर देखील ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे. मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु त्यांनी देखील पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.