एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मनोहर जोशींचा आशावाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:54 AM2018-02-21T00:54:19+5:302018-02-21T00:54:47+5:30

माझा सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष झाला. आज तुम्हीदेखील त्याच पद्धतीने काम करीत असून त्याची दखल पक्षाने घेतली आहे.

Eknath Shinde will be the CM, Manohar Joshi's optimism | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मनोहर जोशींचा आशावाद

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मनोहर जोशींचा आशावाद

googlenewsNext

ठाणे : माझा सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष झाला. आज तुम्हीदेखील त्याच पद्धतीने काम करीत असून त्याची दखल पक्षाने घेतली आहे. त्यामुळे प्रयत्न करीत रहा आपणही मुख्यमंत्री व्हाल, त्यासाठी जिद्द सोडू नका, अशा शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद दिला.
शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याने ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शक्तीस्थळावर सत्कार आयोजित केला होता. महाराष्टÑ भूषण तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांचा हा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर जोशीदेखील उपस्थित होते. त्यांनीच यावेळी बोलतांना ही इच्छा व्यक्त केली. एक सामान्य कार्यकर्ता मोठा कसा होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे हे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांना बघितल्यावरच लगेचच कामे होतात. कदाचित त्यांना दाढी आहे, आणि याच दाढीला घाबरून कामे वेगाने होत अशा मिश्किल शब्दात त्यांनी शिंदे यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे ज्यांनी निवडून दिले त्यांच्याकडूनच हा सत्कार होत असल्याने या पेक्षा सर्वात मोठा आनंदाचा क्षणच असूच शकत नसल्याचे प्रांजळ मतही त्यांनी व्यक्त केले. मीदेखील एक सर्वसामान्य शिवसैनिक होतो. परंतु, बाळासाहेबांनी दाखविलेला विश्वास आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याने दिलेली साथ यामुळेच मी आमदार, मुख्यमंत्री, खासदार, लोकसभा अध्यक्ष होऊ शकलो. मलादेखील वाटले नव्हते, की मला हे सर्व मिळू शकेल. परंतु, प्रयत्न केले तर काहीही होऊ शकते, हे मला समजले त्यामुळेच तुम्ही आत्मविश्वास सोडू नका, तुम्हीही मुख्यमंत्री व्हाल, ही आशा कायम मनात ठेवा, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

हा एक कृतज्ञता सोहळा आहे - बाबासाहेब पुरंदरे
शिवाजी महाराजांचे यश हे त्यांच्या अनुशासनावर होते. मला वाटते एकनाथ शिंदे हे देखील त्याच अनुशासनानुसार काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा झालेला हा सत्कार नसून तो कृतज्ञता सोहळा असल्याचे मत या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. मी महाराजांबद्दल बोलतो ते खरे बोलतो, इतर मला काय म्हणतात माझ्यावर काय टीका करतात, त्याची पर्वा मी करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज माझ्या हस्ते हा सत्कार होण्याऐवजी ज्यांच्या हस्ते हा सत्कार होणे अपेक्षित होते, ते आज हयात नाहीत, दिघे यांच्या हस्ते हा सत्कार होणे अपेक्षित होते. परंतु, आजही ते वरुन शिंदे यांचा हा सत्कार पाहत असतील आणि त्यांना शाबासकी देत असतील.

गुरुच्या साक्षीने शिष्याचा झालेला हा सत्कार आहे - एकनाथ शिंदे
नेतेपदी निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्कार झाले. परंतु, आजच्या सत्कार सोहळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. आज माझ्या घरच्यांनी माझा सत्कार केला आहे. तो त्याही पेक्षा खुप मोठा मानतो. कारण आज एका गुरुच्या साक्षीने म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या साक्षीने शिष्याचा झालेला हा सत्कार असल्याने माझ्यासाठी हा सत्कार खुप मोठा आहे, असे प्रांजळ मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मी आज जो काही आहे, तो केवळ कार्यकर्त्यांमुळेच आहे, कार्यकर्ते हेच माझे बळ आहे. आज मी मोठा झालो असलो तरी आजही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करीत आहे. त्यामुळे आज माझ्या कामाचे चीज झाल्याचे ते म्हणाले. राजकीय जीवनात टीकादेखील होतात आणि कौतुकही होत असते. टीका झाली तर डगमगू नका, पुढे चालत राहा आणि यश आले तर ते त्या यशाने हरळून जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितितांना दिला. अनुषासन शिस्त, नियोजन असेल तर तुमच्या आयुष्यात अवघड असे काहीच नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज मी मोठा झालो असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरु देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मी केवळ दोस्तीसाठी येथे आलो - सचिन पिळगांवकर
सलग ३० वर्षे केलेल्या वेगवेगळ्या कार्याचा हा गौरव असल्याचे मत एकनाथ शिंदे यांचे मित्र तथा ज्येष्ठ सिनेअभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी व्यक्त केले. मी कोणी राजकीय नेता नाही, मी एक अभिनेता आहे, त्यामुळे मी केवळ माझ्या दोस्तीसाठी येथे आज या सोहळ्याचा भाग झालो असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Eknath Shinde will be the CM, Manohar Joshi's optimism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.