एकनाथ शिंदेंचा टोलमुक्तीस नकार, संजय केळकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:21 AM2020-09-05T02:21:13+5:302020-09-05T02:22:21+5:30
आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल ठाकरे सरकारला केला आहे.
ठाणे - मागील कित्येक महिन्यांपासून ठाणेकरांना टोलमुक्ती मिळावी, यासाठी विविध पक्षांनी आंदोलने केली आहेत. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्षच केले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार हे हलक्या वाहनांना टोलमुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल, तर ०४ क्रमांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोलमुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने नऊ महिन्यांनी मिळाले असून त्यात टोलमुक्तीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.
आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय, तर ठाण्यावर अन्याय असे का, असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोलमुक्त केले आहे. ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता तिला नकार देत आहेत, हेही ठाणेकरांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून आमचा ०४ टोलमुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.