एकनाथ शिंदेंची ठाण्यावर कृपादृष्टी, 900 खाटांच्या रुग्णालयासाठी 527 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:00 PM2022-07-06T23:00:18+5:302022-07-06T23:01:00+5:30
दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती.
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुपांतर होण्याच्या मार्गातील अडथळा अखेर दूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या कामासाठीच्या निविदा तात्काळ काढण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५२७ कोटीचा खर्च येणार आहे. त्यानुसार, आता येत्या काही महिन्यातच या रुग्णालयाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यावेळी हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारने ३१४ कोटींचा निधी मंजुर केला होता. मात्र, नंतर कोरोनाच्या महामारीमुळे पुढील गोष्टींना विलंब झाला. परंतु, रुग्णालय आणखी मोठे करण्याचा प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू झाला आणि खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्य केले जाणार आहे. त्यानुसार येथे ५७४ ऐवजी ९०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सुधारीत प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुलं, डिलिव्हरी आणि महिला व ५०० खाटा जनरल रुग्णासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.
यात जनरल खाटामध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, आयसीयू, नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर या कामाचे निविदा प्रक्रिया मागील काही महिने प्रलंबित होते. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची निविदा तत्काळ काढण्याचे व पुढील पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात या कामाच्या निविदा निघणार असून प्रत्यक्ष कामाला एक ते दीड महिन्यात सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.