एकनाथ शिंदे सेना-भाजपातील दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:09 AM2018-02-05T03:09:50+5:302018-02-05T03:10:00+5:30
सगळ््यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सगळ््यात पुढे असलेले नेते ही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास आहे.
डोंबिवली : सगळ््यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सगळ््यात पुढे असलेले नेते ही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास आहे. तसेच ते भाजपा आणि शिवसेनेतील दुवा आहेत, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी येथे केले.
शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानिमित्त सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार प्रीमियर मैदानावर पार पडला. तेव्हा राम शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, बालाजी किणीकर, रुपेश म्हात्रे, सुभाष भोईर, ठाण्याच्या महापौर मनीषा शिंदे, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, आई गंगूबाई आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना विरोधी पक्षात असताना काँग्रेस व राष्ट्रवादीला सळो की पळो करुन सोडण्यात शिंदे याचा कायम सक्रिय सहभाग होता. दिवे आगारला गणपती मंदिरावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी सरकारला घेराव घालून सदनातील कामकाज बंद पाडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यावेळी १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यातील १३ आमदार हे शिवसेनेचे होते. त्यापैकी भाजपाचा मी एक होतो. ठाण्यातील सत्ता काबीज करण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच घडले. लोकनेता असल्याने ते माझ्याही समस्या सोडवितात, अशा शब्दांत राम शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या अपार कष्टाचा संदर्भ देत ते १८-१८ तास काम करत असल्याचा उल्लेख केला. कुटुंबीयांवर जेवढे प्रेम केले नसेल, तितके प्रेम एकनाथ शिंदे यांनी पक्षावर केले आहे. वेगळया मुशीतून तयार झालेला हा नेता आहे. असे सांगात चव्हाण यांनी त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेत स्थापनेपासून काम करत असल्याचा काळ सांगितला. शिंदेचा सत्कार हा मला स्थापनेपासूनचा काळ आठवून देणारा आहे, असे सांगत ते म्हणाले, किसननगरचे शाखाप्रमुख ते नेतेपद हा शिंदे यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. खंडाळा घाटात दरड कोसळल्यावर त्याठिकाणी जाऊन एका लहानशा शिडीवर उभे राहून जीवाची पर्वा न करता पाहणी करणारे शिंदे पाहिले, की जीवाची पर्वा न करता काम करणारा नेता म्हणून त्यांचा गौरव केल्यावाचून रहावत नाही, असे सांगत त्यांनी शिंदे यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन दरडीला जाळी लावली. तेव्हापासून गेल्या दोन वर्षात एकही दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे काम कशाप्रकारे करायचे याचा उत्तम वस्तुपाठ शिंदे यांनी घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
मी डोळ््याचा डॉक्टर बाळासाहेबांमुळे झालो. एकनाथ शिंदे हे माझे मित्र, तर श्रीकांत शिंदे हा माझा विद्यार्थी आहे, अशी ओळख देत डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले, निरपेक्ष वृत्तीने काम करणारे नेते अशीच एकनाथ शिंदे यांनी ख्याती आहे. त्यामुळेच लोक त्यांच्यावर प्रेम करतात. सहृदयी नेता हीच त्यांची खरी ओळख आहे.
एखादी बातमी लावा अथवा लावू नका, असा एकही फोन कधी एकनाथ शिंदे यांनी केला नाही, असे सांगत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी माणसात राहणारे नेते या एकनाथ शिंदे यांच्या गुणाचे कौतुक केले. हल्लीच्या राजकीय नेत्यांकडे हा गुण अभावानेच दिसून येतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
>कायमच कर्तव्यभावनेतून काम केले : एकनाथ शिंदे
सत्काराला उत्तर देताना एकनाथ शिंदे भावनावश झाले. जीवनात कठीण प्रसंगी आनंद दिघे यांनी सावरले. समाजासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. बाळासाहेबांनी प्रेरणा दिली. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाच्या केसेमध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हणून एकनाथ शिंदेचे नाव होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. बाळासोहब व दिघेसाहेब पाठीशी असल्याने मनात कधीही भीती नव्हती. काम करताना कुठलाही स्वार्थ व अपेक्षा ठेवली नाही. माझी पत्नी लता हिने कधीही माझ्या मागे कटकट केली नाही. त्यामुळेच मी समाजासाठी वेळ देऊ शकलो. पक्षाचे काम करु शकलो. त्यामुळे हा सत्कार माझा नसून माझ्या शिवसैनिकांचा आहे. बाळासाहेब, दिघेसाहेब व उद्धवसाहेबांनी दाखविलेल्या विश्वासाचा आहे, असे भावोद््गार त्यांनी काढले. कर्तव्यभावनेतून जनतेची कामे केली. १८ तास काम करताना अनेक लोक भेटतात. कधी वाटते, एखाद्या दिवशी शांत रहावे. पण आपल्याकडे अपेक्षने आलेल्या लोकांची कामे आपण केली नाहीत, तर त्यांचे काय होईल? ते कुठे जातील? या भावनेने पुन्हा शांत राहण्याचा विचार डोक्यातून निघून जातो, असे सांगत त्यांनी आपल्या अहोरात्र कष्टाचे गुपित उलगडले. मंत्री झाल्यावर शिंदेसाहेब बदलतील. त्यांना वेळ मिळणार नाही, अशी सामान्यांची भावना असते. त्यांना पूर्वीचा एकनाथ शिंदे हवा असतो. त्यामुळे जीवाला जीव देणाºया कार्यकर्त्याची अपेक्षा पूर्ण करणे, हेच मी माझे कर्तव्य समजतो, असे त्यांनी सांगितले.
>ब्रेक्रिंग न्यूज...
एकनाथ शिंदे यांच्या एका बाजूला राज्यमंत्री चव्हाण, तर दुसºया बाजूला जलसंपदामंत्री राम शिंदे बसले होते. त्यामुळे हीच खरी ब्रेकिंग न्यूज असल्याची कोपरखळी डॉ. निरगूडकर यांनी मारल्याने हशा पिकला.