उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ
By सदानंद नाईक | Published: February 14, 2023 05:52 PM2023-02-14T17:52:46+5:302023-02-14T17:58:05+5:30
उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंब असे घट्ट समीकरण असून महापालिका सत्तेसाठी भाजपनेही यापूर्वी ओमी कलानी यांच्या सोबत घरोबा केला होता.
उल्हासनगर - शहरातील संच्युरी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन सोहळा संपन्न झाल्यावर सभा होणार आहे. सभेत ओमी कलानीसह समर्थक प्रवेश घेणार असल्याची चर्चा शहरात रंगली असून स्थानिक शिंदे समर्थकाना या प्रवेश प्रक्रियेबाबत अंधारात ठेवल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंब असे घट्ट समीकरण असून महापालिका सत्तेसाठी भाजपनेही यापूर्वी ओमी कलानी यांच्या सोबत घरोबा केला होता. मात्र ज्योती कलानी यांना विधानसभेची उमेदवारी डावलून भाजपचे पक्षाचे विश्वासू कुमार आयलानी यांना तिकीट दिली. याप्रकाराने नाराज झालेल्या ओमी कलानी यांनी शिवसेनेचे नेते व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत हातमिळवणी करून भाजपाची महापालिकेतील सत्ता उलथून शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना महापौर पदी निवडून आणले होते. दरम्यान कलानी कुटुंबानी ठाणे येथे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला. अंटेलिया येथील सभेत आव्हाड यांनी पप्पु कलानी यांना आम्हीच जेल बाहेर आणल्याचे बोलले होते.
शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यात सत्तेची उलथापालथ झाली. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांची सत्ता येऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. शहराचा आमदार व महापालिका सता हवी असेलतर कलानी कुटुंब हवे. हे मुख्यमंत्री शिंदे हे चांगले जाणून आहेत. त्यामुळे कलानी यांच्या प्रवेशासाठी शिंदे आग्रही आहेत. सुरवातीला नकार घंटा देणारे कलानी कुटुंब बाळासाहेबांची शिवसेनामय होते काय? अशी चर्चा शहरात रंगली आहे. कलानी कुटुंबाची राजकीय धुरा वाहणारे ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, त्यांचा मोबाईल बंद आहे. तर त्यांचे कट्टर समर्थक असलेले कमलेश निकम यांनीं मात्र कलानी कुटुंब व समर्थक शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेणार नाही. असे सांगितले. महाविकास आघाडी भाजप युतीला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत चितपट केल्या शिवाय राहणार नाही. असे निकम सांगून पक्षप्रवेशाला पूर्णविराम दिला.
सभेसाठी गर्दी जमविण्याचे टार्गेट?
शहरातील संच्युरी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून सभेला गर्दी जमविण्यासाठी स्थानिक नेत्यांना टार्गेट देण्यात आल्याची चर्चा रंगली. तसेच पक्ष प्रवेश घेण्यासाठी इतर पक्ष नेते, पदाधिकारी यांची चाचपाणी स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे.