किडणीविकारग्रस्ताला पालकमंत्र्यांचा आधार, निराधार शिवसैनिकावर 'लाख'मोलाचे उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:44 PM2020-03-17T20:44:15+5:302020-03-17T20:56:16+5:30
विनय वायगंनकर हे गेल्या 7 वर्ष पासून किडनी डायलिसिसच्या आजाराने त्रस्त आहेत.
मुंबई - निराधार जेष्ठ शिवसैनिकाच्या मदतीसाठी अखेर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी धाव घेतली. गेल्या आठवड्यात व्हाट्सअप आणि फेसबुक या समाजमाध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत काम केलेल्या आणि मुंबईतील वांद्रे पूर्व येथे वास्तव्यास असणाऱ्या एका निष्ठावंत शिवसैनिकाची हृदयद्रावक कहाणी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर, शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक विनय मुरारी वायंगणकर यांस 1 लाख रुपयांची मदत केली.
विनय वायगंनकर हे गेल्या 7 वर्ष पासून किडनी डायलिसिसच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आठवड्यातून दोनदा तर महिन्यातून किमान 8 ते 10 वेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे किडणी प्रत्यारोपण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये महत्प्रयासानंतर त्यांना किडनी डोनर मिळाला. मात्र, किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियासाठी त्यांना 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकही अपत्य नसलेल्या आणि पूर्णतः निराधार असलेल्या तसेच गेली 7 वर्षांपासून आर्थिक उत्पन्नाचं कोणतंही साधन नसलेल्या या ज्येष्ठ शिवसैनिकाला आर्थिक मदत करावी अशा आशयाची पोस्ट गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
शिवसेना भवन येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यापर्यंत सदर पोस्ट पोहोचल्यानंतर त्यांनी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक विनोद ठाकूर यांनी सदर बाब नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक वायगंकर यांस 1 लाख रुपयांची मदत केली. इथेच न थांबता मंत्री शिंदे यांनी लीलावती हॉस्पिटल प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधत आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात उपरोक्त शस्त्रक्रिया करण्याचे निर्देशही दिले.
दरम्यान, पूर्णतः निराधार असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिक विनय वायगंकर यांस आणखी आर्थिक मदतीची गरज असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या दानशूर व्यक्तीना सदर रुग्णाला आर्थिक मदत करावयाची आहे, त्यांनी थेट उपरोक्त रुग्णाच्या खात्यात रक्कम जमा करावी, असेही आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने आहे.
रुग्णाचा तपशील :-
बँकेची नाव: - बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा : - मुंबई बांद्रा पूर्व,
रुग्णाचे नाव - विनय मुरारी वायंगणकर
अकाउंट नंबर - २००४५३२९२८४
आयएफएससीकोड : MAHB 0000164