"मदत करताना एकनाथ शिंदे यांच्यात आपलेपणाची भावना"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:33 AM2021-02-10T01:33:32+5:302021-02-10T01:34:22+5:30
सचिन पिळगावकर यांचे मत
ठाणे : संकटात मदतीला धावताना पालकमंत्री एकनाथ शिंदे माणूस म्हणून धावतात. मदत करताना ‘आपला माणूस’ ही भावना त्यांच्या मनात असते. समोरच्याला मदत करताना ते कोणताही राजकीय पक्ष पाहत नाहीत, अशी माणसे समाजात कमी आहेत, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या.
पालकमंत्री शिंदे यांच्यावर आधारित ‘अनाथांचा नाथ एकनाथ... एक संगीतमय प्रवास’ या ध्वनिचित्रफितीचा अनावरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. हे गीत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी लिहिले असून त्यांच्या आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीत दिले आहे. हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायिले आहे. यावेळी पिळगावकर यांच्या हस्ते ध्वनिचित्रफितीचे विमोचन करण्यात आले. शिंदे हे ठाण्याचे पालकत्व स्वीकारणारे खऱ्या अर्थाने पालकमंत्री आहेत. मी अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे आहेत. त्यांनी कोरोना काळात जे कार्य केले त्यातील काही क्षणांचा मी स्वतः साक्षीदार आहे. ते केवळ अनाथांचे नाही तर अनेकांचे, सर्वांचे नाथ आहेत. हे गीत भविष्यात ठाणे गौरव गीत व्हावे अशी इच्छा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली.
पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा म्हणाले की, मी देखील त्यांनी केलेल्या कार्याचा साक्षीदार आहे. यावेळी महाडच्या दुर्घनटनेचा प्रसंग त्यांनी सांगितला.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले, मी त्यांची धार आणि आधार हे दोन्ही पाहिले आहेत. शिंदे हे केवळ एकनाथ नव्हे तर लोकनाथ, जगन्नाथ व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दिघेंच्या आठवणींना उजाळा
१९८४ ला मी शाखा प्रमुख झालो तेव्हा मी २० वर्षांचा होतो. मी आनंद दिघे यांच्या सानिध्यात राहिलो. त्यावेळी अनेक आंदोलने केली. आनंदाश्रमात त्यांच्याकडून कार्यपद्धती शिकलो, हे सांगताना त्यांनी दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाखाप्रमुख ते मंत्री पदापर्यंतचा प्रवासात कठीण प्रसंग, संघर्ष आहे. दुसरीकडे समाधानही आहे. मी शिवसेनेचा नेता असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवला, असे शिंदे म्हणाले.