"राष्ट्रवादी आणि त्यांच्या प्रेम संबंधाचा अंत...", संजय शिरसाटांची संजय राऊतांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 03:17 PM2023-05-26T15:17:13+5:302023-05-26T15:17:46+5:30
खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत असतात.
ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत असतात. याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे. त्यांना काही ना काही बडबड करुन कोणाला नांदू द्यायचं नाही असं दिसतंय. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं पण त्यांनी रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ला आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर जास्त इफेक्ट झालेला आहे, अशा शब्दांत शिरसाट यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.
संजय राऊतांवर बोचरी टीका
"ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुल होत नाही असे म्हणतात. मात्र, संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुले होईल, असं म्हणणाऱ्यांपैकी आहे. १८ खासदारांपैकी तेरा खासदार निघून गेले पाच राहिले तरी दावा १९ चा करतात हे मूर्खपणाचे जे लक्षण आहे, ते संजय राऊतमध्ये आहे", अशी बोचरी टीका शिरसाट यांनी केली.
तसेच संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असून राष्ट्रवादी आणि त्यांचे जे प्रेम संबंध चालू आहे, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार आणि तो सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढले पाहिजे होते, असंही शिरसाटांनी म्हटलं. गजानन कीर्तिकर यांच्याविषयी बोलताना शिरसाटांनी म्हटलं, "जागा वाटपाची प्राथमिक बोलणी सुद्धा सुरू झाली नाही, आमची बोली सुरू होईल त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील." मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं शिरसाटांनी स्पष्ट केलं.