वृद्ध दाम्पत्याची चोरीच्या उद्देशानेच हत्या  

By अजित मांडके | Published: February 17, 2024 07:22 PM2024-02-17T19:22:49+5:302024-02-17T19:22:58+5:30

 २५ दिवसानंतर चितळसर पोलीसांच्या तपासाला आले यश, दोन आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी.

Elderly couple killed with intent to steal | वृद्ध दाम्पत्याची चोरीच्या उद्देशानेच हत्या  

वृद्ध दाम्पत्याची चोरीच्या उद्देशानेच हत्या  

ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागातील रेंटलच्या इमारतीमधील एका सदनिकेतील समशेर बहादूर सिंग (६८) आणि मिना समशेर सिंग (६५) या वृध्द दाम्पत्यांच्या खून प्रकरणात अखेर दोघांना चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे आरोपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास होते. तरीही ते पोलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत होते. सिंग दाम्पत्याचा ५ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या घरातच संशयास्पद मृतदेह आढळले होते. गळा दाबून त्यांची हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली होती. त्यानुसार याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चितळसर पोलिसांनी दोघांना २५ दिवसांच्या तपासानंतर अटक केली आहे. चोरीच्या उद्देशानेच ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. अटक आरोपींना २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे निसार अहमद शेख (२७) आणि रोहीत उतेकर अशी आहेत. यातील शेख हा कळवा रुग्णालयात कामाला आहे. हे दोघेही त्याच इमारतीत वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. समशेर आणि मिना या दोघांच्याही अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नव्हत्या. घरातून सामान देखील चोरीला गेले नव्हते. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या दोस्ती एम्पेरिया या इमारतीतील १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत हे दाम्पत्य वास्तव्याला होते. मुलगा सुधीर हा अंबरनाथमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी समशेर हे परिसरातील गृहसंकुलामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी घरातून दूध विक्रीचा व्यवसाय करीत होती. सुधीर हा दररोज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असे. आई आणि वडिलांचे मोबाईल बंद असल्याने ४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास आई-वडिलांना तो भेटण्यासाठी मानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी घराचा अर्धवट दरवाजा उघडा होता. त्यावेळी दोघांचेही संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुधीर यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या पथकाने हा तपास केला. यामध्ये त्याच इमारतीमधील दोघांना तब्बल दीड महिन्यांनी गुरुवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी इमारतीमधील लिप्टजवळील सीसीटीव्हीचे दोन दिवसांचे फुटेज तपासले होते. त्यात बाहेरुन व्यक्ती इमारतीत आला नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे हत्या करणारा हा त्याच इमारतीमधील असावा असा संशय बळावला होता. त्यानुसार चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अभिषेक सांवत व पोलीस शिपाई शैलेश भोसले या दोघांनी याचा २५ दिवस तपास केला. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बिल्डींग नंबर २ मध्ये राहणारा निसार शेख हा बिल्डींग नं.१ मधील १६ व्या माळ्यावरील रोहीत उतेकर याच्याकडे जातो व तो संशयीत असावा अशी खात्री झाल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या नंतर या हत्येचा उलघडा झाला. अटक आरोपी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी रुम नं. १६२५ च्या बाथरुमच्या खिडकीतून प्रवेश करुन मयताच्या बाथरुमध्ये प्रवेश केला. त्यानंतर समशेर सिंग व मिना सिंग यांचा गळा दाबून खुन केला. तसेच त्यांच्या घरातील मोबाईल, मयत महिलेच्या बांगड्या तसेच कानातील टॉप्स असे चोरी केले असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानुसार आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरिक्षक गिरीश गोडे करीत आहेत. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सर्जेराव कुंभार करीत असून अटक आरोपींना २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Elderly couple killed with intent to steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे