वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ठाण्यात वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Updated: August 23, 2022 17:28 IST2022-08-23T17:25:28+5:302022-08-23T17:28:35+5:30
कामोठे गावातील रहिवाशी चव्हाण हे ट्रक चालक होते. ते त्यांचा ट्रक घेऊन उपवन येथे सकाळीच काही कामानिमित्त आले होते.

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ठाण्यात वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
ठाणे - उपवन येथे महावितरणच्या एका विद्युत डीपीतून बाहेर आलेल्या लोखंडी पट्टीशी संपर्क आल्याने वीजेच्या धक्क्याने कळंबोली येथील भाऊराव चव्हाण (६५) या ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. चव्हाण हे मोटारसायकल बाजूला करताना हा प्रकार घडला. वीज वितरणच्या या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील कळंबोली, कामोठे गावातील रहिवाशी चव्हाण हे ट्रक चालक होते. ते त्यांचा ट्रक घेऊन उपवन येथे सकाळीच काही कामानिमित्त आले होते. सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ते रामबाग येथील स्मशानभूमी रोडवर ट्रक वळवत असताना त्यांना दुचाकीचा अडथळा आला. त्यामुळे ट्रकमधून उतरून समोर असलेल्या दुचाकीला बाजूला करण्यासाठी ते गेले. त्यावेळी वीज वितरणच्या डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे वीजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह बाजूला केला. पुढील कार्यवाहीसाठी तो जिल्हा रुग्णालयात तो पाठविण्यात आला आहे.
वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाहक या वृद्ध ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचा आधार गेला. राज्य शासनाने त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची गरज आहे.
प्रकाश राठोड, ठाणे.