ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया द्वारे वृद्धेच्या बदलली हृदयाची झडप
By धीरज परब | Published: March 14, 2024 04:12 PM2024-03-14T16:12:06+5:302024-03-14T16:16:09+5:30
हीरा मिश्रा यांना दोन वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या. नंतर दोन स्ट्रोकचे निदान झाले . त्यांच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले.
मीरारोड - कोमॉर्बिडीटीज, दोन स्ट्रोक आणि दोन अँजिओप्लास्टीची वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या ७२ वर्षीय वृध्द महिलेच्या हृदयाची झडप ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया द्वारे चिरफाड न करता बदलण्यात डॉक्टरांना यश आले .
हीरा मिश्रा यांना दोन वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या. नंतर दोन स्ट्रोकचे निदान झाले . त्यांच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शारीरिक हालचालींवर निर्बंध येऊन चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि श्वासोच्छवासासंबंधी त्रास होऊ लागला. यासाठी अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर तावी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. इंटर्वेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप ताकसांडे, कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मयुरेश प्रधान आणि स्ट्रक्चरल हार्ट डिसीज इंटरवेंशन कार्डिओलॉजिस्ट आणि तज्ञ डॉ. माणिक चोप्रा यांच्या पथकाने ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट प्रक्रिया करण्यात आली.
डॉ अनुप ताकसांडे म्हणाले कि , रुग्णाची प्रकृती गंभीर होती. महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद होत होता. एओर्टिंक स्टेनोसिसचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे येतात व ते कमकुवत होते. कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यांसारख्या कॉमोरबिडीटी असलेल्या ६५ वर्षांवरील वृद्धांमध्ये ही स्थिती दिसून येते. ६५ वर्षांवरील लोकसंख्येपैकी सुमारे ०.५% ते १% टक्के लोकांना कॅल्सिफिक एओर्टिंक वाल्व्ह स्टेनोसिसचा त्रास होतो.
टीएव्हीआय शस्त्रक्रिया रोगग्रस्त महाधमनी (एओर्टिक) व्हॉल्व्ह रोपण करण्यासाठी केली जाते. ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची विनाटाक्यांची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते. यात विकृती आणि मृत्यूचा धोका कमी करता येतो . ही प्रक्रिया सौम्य ऍनेस्थेसिया देऊन केली जाते आणि रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. या प्रक्रियेस केवळ ३० मिनिटे लागतात. या रुग्णाला एका दिवसासाठी आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि १२ तासानंतर हा रुग्ण चालू फिरु लागला असे डॉक्टर म्हणाले .