दूध आणायला जाणाऱ्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 08:40 IST2025-01-24T08:39:49+5:302025-01-24T08:40:00+5:30
Thane News: येथील तीन हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या पुष्पश्री श्रीपाद आगाशे (वय ७३) यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली.

दूध आणायला जाणाऱ्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
ठाणे - येथील तीन हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या पुष्पश्री श्रीपाद आगाशे (वय ७३) यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली. वाहनाच्या धडकेनंतर गंभीर जखमी वृद्धेला मदत करण्याऐवजी चालकाने तिथून पळ काढला. त्याचा शोध घेण्यासाठी नौपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू केले आहे. त्याआधारे वाहनाचा शाेध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितले. पुष्पश्री या पत्रकार आशिष आगाशे यांच्या मातोश्री होत्या.
असा झाला अपघात
पुष्पश्री या मनोरुग्णालयाजवळील रोशनी कॉम्प्लेक्समध्ये राहत हाेत्या. २३ जानेवारीला सकाळी त्या दूध आणण्यास घराबाहेर पडल्या. त्या ७ वाजण्याच्या सुमारास घरी परतत होत्या. त्यावेळी तीन हात नाका येथे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना धडक दिली.
त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील शीव येथील लाेकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले.