माणुसकीला काळीमा...भार्इंदरमध्ये वृद्ध रुग्णाला थेट फुटपाथवर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:38 PM2018-09-28T21:38:57+5:302018-09-28T21:41:57+5:30
का समाजसेविकेने त्या रुग्णाला पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याला बाहेर फेकून देण्याचे फर्मान सोडले. या समाजसेविकेच्या आदेशाला रुग्णालयातील कर्मचारी एवढे बांधिल झाले कि त्यांनी त्या वृद्ध रुग्णाला थेट रुग्णालयाजवळील फूटपाथवरच आणून टाकले.
- राजू काळे, लोकमत न्यूज नेटवर्क
भाईंदर - येथील भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेणाऱ्या वृद्ध रुग्णाला एका समाजसेविकेच्या आदेशाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी थेट फुटपाथवर टाकल्याची संतापजनक घटना गुरुवारी दुपारी घडली.
अंदाजे ६० वर्षे वय असलेल्या या रुग्णाला मनोविकार असल्याने त्याला स्वतःचे नाव आठवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी काही लोकांनी त्याला उपचारासाठी जोशी रुग्णालयात दाखल केले. त्याला स्वत:चे नाव माहित नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. तत्पूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तींची सर्व माहिती रुग्णालयातील रजिस्टरमध्ये नोंद करणे अपेक्षित असताना केवळ मोबाईल क्रमांकच नोंद करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्ण बरा झाल्याने त्याला २६ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देताना रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही.
उपचारादरम्यान रुग्णाला भेटण्यासाठी देखील कोणीही नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्ती आल्या नाहीत. अखेर हा रुग्ण २६ सप्टेंबरला रुग्णालयातून परस्पर बाहेर पडल्याचे सांगितले जात असून त्याला रोखण्यासाठी मात्र तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. रुणालयाच्या या भोंगळ कारभारामुळे त्या रुग्णाच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास तो पुन्हा रुग्णालयात आला. त्यावेळी तो रुग्णालय परिसरातील पार्कींगच्या जागेत झोपल्याचे अनेकांनी पाहिले. मात्र दुसऱ्या दिवशी एका समाजसेविकेने त्या रुग्णाला पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याला बाहेर फेकून देण्याचे फर्मान सोडले. या समाजसेविकेच्या आदेशाला रुग्णालयातील कर्मचारी एवढे बांधिल झाले कि त्यांनी त्या वृद्ध रुग्णाला थेट रुग्णालयाजवळील फूटपाथवरच आणून टाकले.
हा रुग्ण कित्येक वेळ फूटपाथवर पडून असल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच तेथे टाकल्याचे समोर आले. त्याची चर्चा होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाला पुन्हा व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
तो वृद्ध मनोरुग्ण असून रुग्णालयात दाखल असताना तो अनेकदा वॉर्डमधून परस्पर निघून जात असे. २६ सप्टेंबरला तो परस्पर रुग्णालयातून बाहेर गेला होता. पुन्हा रुग्णालयात आल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी फूटपाथवर टाकले, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच आदेश देणाऱ्या व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. आनंद कुमार पांचाळ, अधिक्षक, पालिकेचे रुग्णालय