मोटारकारच्या धडकेमध्ये पादचारी वृद्ध गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:15 AM2021-02-03T00:15:23+5:302021-02-03T00:17:40+5:30
भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारच्या धडकेमध्ये सदानंद चव्हाण (८३, रा. पाचपाखाडी, ठाणे) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना पाचपाखाडी येथे नुकतीच घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारकारच्या धडकेमध्ये सदानंद चव्हाण (८३, रा. पाचपाखाडी, ठाणे) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना पाचपाखाडी येथे नुकतीच घडली. याप्रकरणी अज्ञात चालक महिलेविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाण हे २९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडीतील म्हात्रे वडापाव दुकानाकडून तळवलकर जिमच्या बाजूला असलेल्या डाव्या बाजूने पायी जात होते. त्याचवेळी त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या राखाडी रंगाच्या एका मोटारकारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारकारची त्यांच्या पायाच्या खुब्याजवळ धडक बसली. तसेच त्यांच्या डाव्या पायाच्या पंज्यावरुन या कारचे चाक गेले. यात डाव्या पायाचा अंगठा आणि करंगळीच्या मधील तीन बोटे फ्रॅक्चर झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता अपघातग्रस्त चव्हाण यांना कोणतीही मदत न करता तिथून पसार झालेल्या अज्ञात चालक महिलेविरुद्ध ३० जानेवारी रोजी चव्हाण यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.