ज्येष्ठांनी जिद्दीने केली कोरोनावर मात; नोव्हेंबरची सुरुवात दिलासादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 12:29 AM2020-11-08T00:29:23+5:302020-11-08T00:29:28+5:30
सात हजार २५० जण झाले ठणठणीत बरे
ठाणे : ऑक्टोबरअखेरपासून ठाण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोरोनाच्या रोजच्या रुग्णांची संख्या ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. सहा दिवसांत शहरात ९५८ कोरोनाचे रुग्ण आढळले असले, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, याच सहा दिवसांत कोरोनातून १,२०२ रुग्ण पूर्ण बरे झाल्याचे दिसून आले आहे. तर, या सहा दिवसांत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ठाणे शहरात कोरोनाचा चढता आलेख काहीसा खाली येऊ लागला आहे. मार्चपासून कोरोनाची सुरुवात ठाण्यात झाली. मे ते ऑगस्टपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत हाेती. त्यातही मृत्युदर आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे दिसत होते.
मृत्युदर रोखण्यासाठी विविध स्वरूपाचे प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. आता त्याला काही प्रमाणात का होईना, यश आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची घटती संख्या डोळ्यांसमोर ठेवून या कामात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिक्षकांनाही मुक्त केले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत शहरात २,१९७ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत होते, तर, या कालावधीत ४३ हजार १५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले. तर, एक हजार १४९ रुग्णांचा या कालावधीत मृत्यू झाल्याचे दिसले.
बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर
मागील सहा दिवसांत १२०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ठाण्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे (रिकव्हरी रेट) हा ९३ टक्के झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांना दिवाळीच्या ताेंडावर माेठा दिलासा मिळाला आहे.