स्थायीच्या ८ जागांसाठी निवडणूक
By admin | Published: November 8, 2016 02:09 AM2016-11-08T02:09:12+5:302016-11-08T02:09:12+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य येत्या १ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्त होत असून चिठ्ठ्या टाकून त्यांच्या निवृत्तीचा निर्णय होेणार असल्याने कोण बाद होतो
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य येत्या १ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्त होत असून चिठ्ठ्या टाकून त्यांच्या निवृत्तीचा निर्णय होेणार असल्याने कोण बाद होतो, याबाबत जशी उत्सुकता आहे. तशीच स्थायी समितीवर वर्णी कुणाची लागणार, याचे औत्सुक्य आहे. इच्छुकांनी आपली वर्णी लागावी याकरिता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
स्थायीचे एकूण १६ सदस्य आहेत. यात सभापती संदीप गायकर, रमाकांत पाटील, विशाल पावशे, शिवाजी शेलार, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे (सर्व भाजपा), दशरथ घाडीगांवकर, मोहन उगले, राजाराम पावशे, प्रेमा म्हात्रे, हर्षाली थविल, राजेश मोरे, राजवंती मढवी-शेट्टी (सर्व शिवसेना), कासिफ तानकी (शिवसेना सहयोगी अपक्ष) यांच्यासह ज्योती मराठे (मनसे) आणि जान्हवी पोटे (काँग्रेस) या सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान १ डिसेंबरला वर्षाचा कालावधी संपुष्टात येत असल्याने यातील ८ सदस्यांना नियमानुसार निवृत्त केले जाणार आहे. प्रत्येक सदस्यांच्या नावाच्या १६ चिठ्ठ्या टाकून यातील ८ चिठ्ठ्या काढून सदस्यांची निवृत्ती जाहीर केली जाणार आहे. या चिठ्ठ्यांमधून कोणाला निवृत्त व्हावे लागते याबाबत उत्सुकता आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य निवृत्त होतील तेवढेच नवीन सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या नवीन नगरसेवकांना संधी मिळते याबाबतही उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)