मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे निवडणूक ऑलाउट ऑपरेशन
By धीरज परब | Published: March 24, 2024 11:32 AM2024-03-24T11:32:53+5:302024-03-24T11:33:58+5:30
मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने १६ मार्च पासुन आचार संहिता लागु झाली असून मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या .
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सह परिमंडळ १ मधील सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पोलीस अधिकारी - कर्मचारी यांनी ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.
ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान ५ वॉरंट मधील व फरारी २ आरोपी यांना अटक करण्यात आली . अमली पदार्थ विरोधी कायद्या खाली ११ गुन्हे दाखल करण्यात आले तर १७ जणांवर सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली. दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले, कोप्ता अंतर्गत १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले . गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १७ हिस्ट्रीशिटर यांची तपासणी केली . शहरात राहणारे ८ विदेशी नागरीक तपासले तर ७ तडीपार इसमाची माहिती घेण्यात आली . शहरातील ५४ ऑर्केस्ट्रा बार व लॉजेस तपासण्यात आले होते .
पोलिसांनी १९ विविध ठिकाणी अचानकपणे नाकाबंदीचे लावली. नाकाबंदीच्या वेळी ३९७ संशयीत वाहने तपासण्यात आली असुन मोटार वाहन कायदया अन्वये १४९ केसेस करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे .