इलेक्शन बजेट : ठाणेकरांना खुशखबर, ना कर, ना करवाढ! कळवा-मुंब्र्याला दाखवला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:47 AM2022-02-11T06:47:59+5:302022-02-11T06:49:49+5:30

ठाणे महापालिकेचा २०२१-२२ चा ३,५१० कोटींचा सुधारित अर्थसंकल्प व २०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प याचा विचार करता आर्थिक वर्षअखेर ३० लाखांची शिल्लक राहिली आहे.

Election budget: Good news for Thanekars, no tax, no tax hike | इलेक्शन बजेट : ठाणेकरांना खुशखबर, ना कर, ना करवाढ! कळवा-मुंब्र्याला दाखवला ठेंगा

(छाया :  विशाल हळदे)

googlenewsNext

ठाणे : महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला २०२२-२३ चा ३२९९ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना गुरुवारी सादर केला. गेले काही दिवस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून आयुक्तांवरही आव्हाड यांनी शरसंधान केले असल्याने कळवा-मुंब्र्याच्या पदरात या अर्थसंकल्पातून काही पडलेले नाही. यापूर्वी कळव्यात प्रस्तावित असलेले नाट्यगृह वागळे इस्टेट परिसरात हलवून एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला.

ठाणे महापालिकेचा २०२१-२२ चा ३,५१० कोटींचा सुधारित अर्थसंकल्प व २०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प याचा विचार करता आर्थिक वर्षअखेर ३० लाखांची शिल्लक राहिली आहे. आगामी वर्षीच्या ३,२९९ कोटींच्या अर्थसंकल्पात २,१७० कोटी २५ लाखांचा महसुली आणि १,१२८ कोटी ४५ लाख भांडवली खर्च प्रस्तावित आहे. क्लस्टर, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, पार्किंग सुविधा, अर्बने डेन्स फॉरेस्ट्री, थीम पार्क, फिल्म इन्स्टिट्यूट, धर्मवीर आनंद दिघे स्मारक, वागळे इस्टेट भागात नाट्यगृह, प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना आदींसह इतर नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

कोरोनाची छाया या अर्थसंकल्पावर दिसली. मागील वर्षी २,७५५ कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला होता. त्यात यंदा ५४४ कोटींची वाढ करण्यात आली. महापालिकेच्या उपन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर दिला आहे. मालमत्ता कर विभागाकडून ७१३.७७ कोटी, विकास व तत्सम शुल्कापोटी ९४१.६४ कोटी, स्थानिक संस्था करापोटी १२३९ कोटी ३९ लाख, पाणीपुरवठा विभाग २०० कोटी, अग्निशमन दल १०४.८० कोटी, स्थावर मालमत्ता २१.५ कोटी, जाहिरात फी २२ कोटी अनुदानातून १११ कोटी ७० लाख, कर्जातून २५० कोटी ७६ लाख असे उत्पन्न प्रस्तावित आहे.

कोरोनामुळे इतर कामांवर खर्च कमी होत असल्याने कोरोना नियंत्रण व उपाययोजनेसाठी २२३ कोटी, पाणी खरेदी ४४ कोटी, परिवहनसाठी ७६ कोटी असा महसुली खर्च अपेक्षित आहे तर, भांडवली खर्चाकरिता ९३५ कोटी ३७ लाखांची तरतूद प्रस्तावित आहे. नगरसेवक, निधी हा सरत्या आर्थिक वर्षात अखर्चित राहिल्यामुळे भांडवली खर्चात कपात केली.

फिल्म इन्स्टिट्यूटसाठी पाच कोटींचा खर्च 
तलाव सुशोभीकरणासाठी १० कोटी, धर्मवारी आनंद दिघे स्मारक ५ कोटी, जांभळी नाका मार्केट पुनर्विकास ५ कोटी, पार्किंग सुविधांची उभारणी व भूमिगत वाहनतळ १० कोटी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व अद्ययावतीकरण २६ कोटी, शहर सौंदर्यीकरणासाठी १३० कोटी तरतूद केली असून २५ कोटींची वाढीव तरतूद केली. शाळा परिसरात सुरक्षा उपाययोजना १० कोटी, अर्बन डेन्स फॉरेस्ट्री ५ कोटी, थीम पार्क विकसित ४ कोटी, ठाण्यात आता फिल्म इन्स्टिट्यूट सुरु करण्यासाठी 

५ कोटी, रस्ते सुरक्षेसाठी फुटपाथ 
१० कोटी, पाणीपुरवठा विस्तार व मजबुतीकरण ५० कोटी, वाहतूक नियमन उपाययोजना १० कोटी, रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण १० कोटी, मॉडेल मिल येथे ट्रक टर्मिनस १ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.

हाती पैसा असला तरच अर्थसंकल्प प्रत्यक्षात येताे. ठाणे पालिकेचे आयुक्त विपिन शर्मा गुरूवारी बॅग घेऊन अर्थसंकल्प सादर करायला निघाले खरे, पण जनजागृतीसाठी पालिकेनेच लावलेल्या पोस्टरने तूर्त तरी हे शब्दांचेच बुडबुडे असल्याचा संदेश जणू ठाणेकरांना दिला. 


 

Web Title: Election budget: Good news for Thanekars, no tax, no tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.