मोदी चित्रपटाच्या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:17 AM2019-04-15T06:17:23+5:302019-04-15T06:18:12+5:30
निवडणुकीच्या कालावधीत मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
ठाणे : निवडणुकीच्या कालावधीत मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी ठाणे शहरात चौकाचौकांत मोदी चित्रपट व नमो टीव्हीचे पोस्टर लावून जाहिरात करण्यात आली आहे.
यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही ठाणे महापालिकेने पोस्टर लावण्यासाठी कशी परवानगी दिली, अशी विचारणा करून चौकशीअंती दोषींवर कारवाई होणार असल्याचे ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार म्हणाले.
निवडणुकीच्या काळात या चित्रपटाची जाहिरात करणारे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे, त्यावर निवडणूक यंत्रणेकडून काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारीही आल्याचे पवार यांनी सांगितले.
>खुलासा मागितला
या तक्रारींची निवडणूक यंत्रणेने दखल घेतली असून कारवाईसाठी महापालिकेकडून खुलासा मागितला आहे. शहरात पोस्टर लावण्यासह जाहिरात करण्यासाठी महापालिका परवानगी देते. त्यांनी अशी परवानगी कोणाला दिली आहे. शहरात ठिकठिकाणी कोणी या चित्रपटाचे जाहिरातीच्या दृष्टीने पोस्टर, बॅनर लावले आहेत, यासंदर्भात चौकशी सुरू असून महापालिकेलादेखील विचारणा केली आहे. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांसह संबंधित जाहिरात लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.